मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो-९ (मेट्रो-७ चा विस्तार) मार्गिकेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (एमएमआरडीए) सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासह इतर पूर्वकामांनाही सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार आहे.दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशा मेट्रो-७ मार्गिकेचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. या मेट्रो-७ मार्गिकेचा विस्तार म्हणजेच मेट्रो-९ ही मार्गिका आहे. दहिसर पूर्व ते मीरा भार्इंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अंतर १३.५४ किमी इतके असणार आहे.दहिसर पूर्व ते मीरा भार्इंदर आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो-९ मार्गिकेवर एकूण ११ स्थानके आहेत. या प्रकल्पाचा खर्च ६ हजार ६०७ कोटी रुपये इतका आहे. या मार्गिकेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याने लवकरच बांधकामही सुरू करण्यात येणार आहे.ही कामे सुरू : मेट्रो-९ या मार्गिकेवर बॅरिगेट्स बसवण्यात आले असून इतर पूर्व कामे म्हणजेच माती परीक्षण, सर्वेक्षण, पाइप लोड अशा कामांना सुरुवात करण्यात आली असल्याचे एमएमआरडीएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
मेट्रो-९ मार्गिकेचे सर्वेक्षण सुरू; कामाला येणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:32 AM