मेट्रोच्या कोचचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते अनावरण : मे महिन्यात प्रवाशांच्या सेवेत हाेणार रुजू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे काम वेगाने सुरू असून, या मार्गासाठी लागणाऱ्या मेट्रो कोचचे अनावरण केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी बंगळुरू येथे करण्यात आले. आता लवकरच या दोन्ही मार्गांसाठी लागणारे मेट्रो कोच मुंबईत दाखल होतील. अनावरण झालेल्या मेट्रो ड्रायव्हरलेस तंत्रावर आधारित आहेत.
या मेट्रोसाठी काम करत असलेले अभियंते आणि तंत्रकुशल कामगार यांचा मला अभिमान असल्याचे राजनाथ सिंह या वेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारताचे हेच खरे योद्धे असून, हेच भारताला पुढे घेऊन जाणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई मेट्रोसाठी लागणारे कोच लवकरच चारकोपमध्ये दाखल होतील. त्यानंतर त्यांची चाचणी सुरू होईल. मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरू होतील. दोन मेट्रोमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोंमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल.
* ‘मुंबई इन मिनिट्स’
मुंबईतील महत्त्वाची केंद्रे मेट्रोमुळे जोडली जातील. पूर्व आणि पश्चिम उपनगर आणखी जवळ येईल आणि प्रवाशांचा सुखकर प्रवास आणि एमएमआरडीएचे ‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे. दरम्यान, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींमुळे काम रखडले. मात्र आता या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरू आहे.
* अशी धावणार मेट्राे
मेट्रो-२ अ - दहिसर ते डी.एन. नगर
मेट्रो-७ - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व
ड्रायव्हरलेस टेक्नोलॉजी
१०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे तिकीट
----------------------------