मनोहर कुंभेजकर
मुंबई - आरे येथील मेट्रो कारशेडला सेव्ह आरे समित्यांच्या सदस्यांचा ठाम विरोध आहे. पर्यावरण तज्ञ व सेव्ह आरेचे सदस्य स्टॅलिन दयानंद हे आरे येथे मेट्रो कारशेडच्या विरोधात कायदेशीर लढाई लढत आहे. सरकार आरेमध्ये मेट्रो कारशेड आणण्याचा प्रयत्न करणार असून मेट्रो बाबतीत शासनाने मेट्रो कारशेडच्या जागेबाबत गठीत केलेल्या समितीने मेट्रो कारशेडसाठी आरे सोडून इतर अन्य ठिकाणी नऊ जागा सेव्ह आरेचा अन्य समितीने शासनाला दाखवल्या आहेत. सेव्ह आरेने समितीला सुचवलेल्या नऊ जागांना समितीने मान्यता दिली असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मात्र शासनाने अजून समितीचा अहवाल प्रसिद्ध केला नसल्याची माहिती सेव्ह आरे या संस्थेचे संस्थापक सदस्य सुभाष राणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वरळी डेअरीच्या जागेतून मिळणारा पैसा या समितीने मेट्रो कारशेडसाठी सांगितलेल्या अन्य नऊ जागांच्या वापरासाठी उपयोगात आणावा असा टोला राणे यांनी लगावला. राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर याच्या म्हणण्यानुसार शासनाची वरळी येथील दूध डेअरीची जागा विकून त्यामधून शासनाला मिळालेल्या पैशांचा उपयोग हा मेट्रो व आरे दूधाचा ब्रँड विकसित करण्यासाठी करणार असल्याचे सूतोवाच नुकतेच मंत्रीमहोदयांनी केले आहे. याविषयी सुभाष राणे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
आरे दूध ब्रँड विकसित करण्याच्या दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या घोषणेचे सुभाष राणे यांनी स्वागत केले आहे. गुजरातमधून अमूल दूध आणण्यापेक्षा प्रगतशील महाराष्ट्र असा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राने दूध उत्पादनात सक्षम होऊन "महा आरे" ब्रँड विकसित करणे ही राज्याच्या दृष्टीने स्वागतार्ह गोष्ट असल्याचे राणे यांनी सांगितले. आरे डेअरी विकसित होणार असल्यामुळे येथील अनधिकृत बांधकामाला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सेव्ह आरे या संस्थेने आरे येथील मोकळ्या जागा अनाधिकृत बांधकामापासून वाचवण्यासाठी गेल्या तीन वर्षात सुमारे 10000 वृक्षारोपण आरे परिसरात केले आहे. तर क्लिन आरे, ग्रीन आरे ही संकल्पना आरेमध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी सुमारे 100 हुन अधिक स्वच्छता मोहिमेद्वारे सेव्ह आरे या संस्थेने विधायक उपक्रम राबवले असल्याचे राणे यांनी अभिमानाने सांगितले.