Join us

मेट्रो कारशेडचा गुंता सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्रो ३ चे कारशेड कांजूर येथे हलविण्याबाबत निर्णय झाला खरा; मात्र येथील कामावर निर्बंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्रो ३ चे कारशेड कांजूर येथे हलविण्याबाबत निर्णय झाला खरा; मात्र येथील कामावर निर्बंध आल्याने राज्य सरकारने आता पर्यायी जागेचा शोध सुरू केला. केवळ मेट्रो ३ नाही तर मेट्रो ६ च्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू आहे. यासाठी वांद्रे - कुर्ला संकुल आणि गोरेगाव येथील जागेचा विचार केला जात आहे. मात्र अद्यापदेखील अंतिम निर्णय झालेला नाही. परिणामी, आता मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडला पर्यायी जागा सुचविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्य सरकारला ही समिती शेडबाबत शिफारस करणार आहे. नगरविकास विभागाने याबाबत निर्णय जारी केला आहे. मेट्रो ३, मेट्रो ६ यांचे एकत्रीकरण करता येईल का? कांजूर येथील जागा आरेपेक्षा योग्य आहे का? शिवाय कुठे वृक्षतोड करावी लागणार आहे का? अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह समिती करणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणेज मेट्रो ३, ४ आणि ६ च्या कारशेडसाठी कांजूर येथे पुरेशी जागा आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत याचा अहवाल समिती सरकारला सादर करणार आहे. दरम्यान, सदर समितीमध्ये पर्यावरण प्रधान सचिव, मुंबई महापालिकेचे आयुक्त, कोकण विभागीय आयुक्त, परिवहन आयुक्त यांच्यासह मुंबई मेट्रो, आयआयटी मुंबई, एमएमआरडीए यांचा समावेश आहे.

भुयारी मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्ग येथील भूखंडावर बांधण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. मात्र आता कांजूरमार्ग येथील भूखंडावर केंद्राने दावा केला आहे. शिवाय हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यामुळे आता आरेनंतर कांजूरमार्ग येथील भूखंडाबाबतही गोंधळ सुरू झाला असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यावर मौन साधले आहे. मेट्रो-३, मेट्रो-६ एकत्र केल्याने खर्च कमी होईल, असा दावा सरकारने केला आहे. कांजूर येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर येथील मातीचे परीक्षणदेखील हाती घेण्यात आले. मात्र पुन्हा वाद निर्माण झाल्याने शेड नक्की कुठे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

----------------------

एमएमआरडीएने मंत्रिमंडळासमोर काय माहिती दिली होती?

- आरे कार डेपो रद्द झाल्यानंतर आतापर्यंत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुल, पहाडी गोरेगाव आणि कांजूर मार्गावरील जमीन यासह वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला.

- मुंबई विद्यापीठाच्या विस्तार आराखड्यामुळे कलिना प्रस्ताव व्यावहारिक आढळत नाही.

- पहाडी गोरेगाव जमिनीबद्दल, यूडीडी, राज्य सरकारने सुधारित डीपीची अंतिम अधिसूचना प्रकाशित केली होती आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आणि मेट्रो कार डेपोसाठी आरक्षण केले होते.

- निवास आरक्षणाच्या अंतर्गत योग्य जमीन पार्सलची जागा घेऊ शकत नसल्यामुळे तेथे मेट्रो-६ व मेट्रो-३ चे दोन्ही डेपो पहाडी गोरेगाव येथे तयार करण्याचे प्रस्तावित केल्यास भूसंपादनाची किंमत जमीन मालकाला द्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या ते महागडे आहे.

- मेट्रो-३ साठी आरे कार डेपोचा प्रस्ताव सोडण्यात आल्याने, कांजूरमार्गची जमीन मेट्रो-३ च्या कार डेपोसाठीही वापरता येऊ शकते.