अखेर मेट्रो कारशेडची गाडी येणार रुळावर; आंदोलकांकडून निर्णयाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:53 AM2020-10-12T02:53:53+5:302020-10-12T06:57:51+5:30
CM Uddhav Thackeray, Aarey Metro Carshed News: आरेतील जंगल वाचले, मेट्रोचा प्रश्न सुटल्याचा आनंद
मुंबई : आरे येथील मेट्रो-३चे कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यांच्या या निर्णयाचे आरे आंदोलकांनी स्वागत केले. यामुळे आरेतील जंगल वाचले असून, मेट्रो कारशेडची गाडी रुळावर येईल, याचाही आनंद असल्याचे मत त्यांनी मांडले.
अखेर लढ्याला यश
पाच वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. २०१७ पासून आम्ही जे सांगत होतो, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. आमचा प्रश्न एकच आहे, हा निर्णय २०१५ साली का नाही घेतला? एवढा वाद, एवढे नुकसान करून काय साध्य केले? जे करणे शक्य आहे ते केलेच पाहिजे, हेच आमचे म्हणणे आहे. कोणताही प्रकल्प हाती घ्या. पर्यावरणाची हानी होता कामा नये. निर्णयाचा आनंद आहे. अखेर लढ्याला यश मिळाले. आमचा विजय झाला. - झोरू बाथेना, आंदोलक, आरे
शाश्वत विकासाचा उत्तम निर्णय
सर्व बाजूंनी विचार करून सरकारने घेतलेला हा अतिशय योग्य निर्णय आहे. यामुळे पैसे वाचले, जमीन वाचली, जंगल वाचले आणि मेट्रोदेखील मिळेल. संपूर्ण जगाला, देशाला, राज्याला या निमित्ताने एक उदाहरण मिळाले आहे की, शाश्वत विकास कसा होऊ शकतो. आम्ही सरकारचे मनापासून आभार मानतो. - डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती
सरकारला नागरिकांचा पाठिंबा
आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. लाखो मुंबईकरांची मागणी होती की, आरेमधील कारशेड कांजूरमार्गला हलविण्यात यावे. यावर पहिल्यापासून जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या म्हणण्यानुसार, जर येथे कारशेड झाले, तर त्याचा फटका विमानतळासह लगतच्या परिसराला बसू शकतो. दुसरीकडे कांजूरची जमीन खासगी आहे, असे म्हटले जात होते. शिवाय ही जमीन पाणथळ आहे, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात आता येथे कारशेड उभारले जाणार आहे. महाविकास आघाडी, ठाकरे सरकारने आज जो निर्णय घेतला, त्याचे सर्वसामान्य मुंबईकर म्हणून आम्ही स्वागत करतो. पर्यावरण रक्षणासाठी सरकार काम करत राहिले, तर नागरिकांचा त्यांना सदैव पाठिंबाच राहील. मेट्रो-४ची कारशेडही कांजूरला येऊ शकते, यावरही विचार करावा. - रोहित जोशी, आरे संवर्धन समिती