मुंबई : पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो मार्गावरील एक्सर आणि मंडपेश्वर स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मेट्रोसेवा बंद पडली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रुळावरून मार्गक्रमण केले. कामानिमित्त बाहेर पडलेल्यांनी दिवस खराब गेल्यामुळे संताप व्यक्त केला.
रेल्वेची गर्दी, रस्ते वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपनगरात जाण्यासाठी मेट्रोला पसंती दिली जाते. असे असताना मेट्रोच्या बिघाडामुळे अनेकांचे दिवसभरातील कामाचे गणित बिघडले. काही वेळाने तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर मेट्रो पुन्हा धावू लागली. तोपर्यंत अनेक प्रवासी थेट रुळावरून चालत जाताना दिसले. मेट्रो सुरू केल्यानंतरही काही काळ गाड्या विलंबाने धावत होत्या.
महामुंबई मेटो ऑपरेशनने तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोची सेवा खंडित झाल्याने प्रवाशांकडे दिलगिरी व्यक्त केली असली तरी ऐन सकाळी अडचणींना सामोरे जात प्रवाशांनी इच्छितस्थळ गाठले.