डिसेंबरपासून मेट्रो कोच मुंबईत येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 02:19 AM2020-09-09T02:19:18+5:302020-09-09T02:19:18+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी नुकतेच बंगळुरू येथील मेट्रो कोच तयार होत असलेल्या ठिकाणास भेट दिली होती.
मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. विशेषत: मेट्रो-२ आणि मेट्रो-७चे काम वेगाने सुरू असतानाच भविष्यात धावणाऱ्या मेट्रोसाठीचे ३७८ कोच एप्रिल २०२१पर्यंत दाखल होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. तत्पूर्वी सहा मेट्रो कोच ११ डिसेंबरच्या आसपास दाखल होतील, असेही प्राधिकरणाचे म्हणणे असून, मेट्रो लाइन २ अ, २ ब आणि ७ या मार्गावरील मेट्रो कोचची निर्मिती करण्यासाठी बीईएमएलची निवड करण्यात आली असतानाच डिसेंबर २०२०पासून मेट्रो कोच मुंबईमध्ये दाखल होऊ लागतील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी नुकतेच बंगळुरू येथील मेट्रो कोच तयार होत असलेल्या ठिकाणास भेट दिली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रोलिंग स्टॉकचे कंत्राट बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स यांना दिले आहे. मेट्रोचे कोच बंगळुरूहून मुंबईत आणण्याबाबतच्या निविदा मागच्या आठवड्यात काढण्यात आल्या होत्या. दरम्यान, एकूण ३७८ कोच वेगवेगळ्या टप्प्यात दाखल होतील. सहा कोचची पहिली मेट्रो ११ डिसेंबरपर्यंत दाखल होईल. मेट्रो-२ दहिसर-डी.एन. नगर आणि मेट्रो-७ दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व हे दोन्ही मार्ग येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र प्राधिकरणाने याबाबत ठोस कालावधी सांगितलेला नाही. दुसरीकडे मुंबई मेट्रोसाठीचे कोच पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात आहे.