Join us

डिसेंबरपासून मेट्रो कोच मुंबईत दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:05 PM

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे.

मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईतल्यामेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. विशेषत: मेट्रो-२ आणि मेट्रो-७ चे काम वेगाने सुरु असतानाच भविष्यात धावणा-या मेट्रोचेसाठीचे ३७८ कोच एप्रिल २०२१ पर्यंत दाखल होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. तत्पूर्वी सहा मेट्रो कोच ११ डिसेंबरच्या आसपास दाखल होतील, असेही प्राधिकरणाचे म्हणणे असून, मेट्रो लाईन २ अ, २ ब आणि ७ या मार्गावरील मेट्रो कोचची  निर्मिती करण्यासाठी बीईएमएलची निवड करण्यात आली असतानाच डिसेंबर २०२० पासून मेट्रो कोच मुंबईमध्ये दाखल होऊ लागतील.  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी नुकतेच बंगळुरु येथील मेट्रो कोच तयार होत असलेल्या ठिकाणास भेट दिली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रोलिंग स्टॉकचे कंत्राट बंगळुरु येथील भारत अर्थ मुव्हर्स यांना दिले आहे. मेट्रोचे कोच बंगळुरुहून मुंबईत आणण्याबाबतच्या निविदा मागच्या आठवड्यात काढण्यात आल्या होत्या. दरम्यान, एकूण ३७८ कोच वेगवेगळ्या टप्प्यात दाखल होतील. सहा कोचची पहिली मेट्रो ११ डिसेंबरपर्यंत दाखल होईल. मेट्रो-२ दहिसर-डि.एन. नगर आणि मेट्रो-७ दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व हे दोन्ही मार्ग येत्या काही महिन्यांत सुरु होण्याची दाट शक्यता आहे. मात्र प्राधिकरणाने याबाबत ठोस कालावधी सांगितलेला नाही. दुसरीकडे मुंबई मेट्रोसाठीचे कोच पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मेट्रो प्रकल्पातील बहुसंख्य कामगारांनी आपआपले मुळ गाव गाठले होते. याचा परिणाम मुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामावर झाला होता. आणि मेट्रोचा कामाचा वेग मंदावला होता. विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कामगारांनी गावाकडचे घर गाठल्याने मेट्रोंचे काम तीन ते सहा महिन्यांनी मागे पडले. मात्र आता कोरोना काळात आपआपल्या मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-७ प्रकल्पासाठी काम करत असलेले शेकडो कामगार परतल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे.

टॅग्स :मेट्रोएमएमआरडीएमुंबई