मेट्रोच्या खोदकामाचा पालिकेला भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:15 AM2019-01-02T05:15:15+5:302019-01-02T05:15:55+5:30
मेट्रो रेल्वेच्या कामाचा केवळ वाहतुकीलाच नव्हे, तर जलवाहिन्यांनाही बसत आहे. मेट्रोच्या खोदकामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन वेळा मोठ्या जलवाहिन्या फुटल्या.
मुंबई : मेट्रो रेल्वेच्या कामाचा केवळ वाहतुकीलाच नव्हे, तर जलवाहिन्यांनाही बसत आहे. मेट्रोच्या खोदकामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन वेळा मोठ्या जलवाहिन्या फुटल्या. मुंबईत अनेक ठिकाणी छोट्या-छोट्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळे महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसला. मात्र, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचा सुमारे १५ लाख रुपये हा खर्च दंड स्वरूपात संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी खोदकाम सुरू आहे. मात्र, खोदकाम करताना कामगार खबरदारी घेत नसल्याने जमिनीखालील जलवाहिन्यांना धक्का बसत आहे. मेट्रो प्रकल्प चार अंतर्गत कुर्ला पूर्व येथे आॅगस्ट महिन्यात जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले, तर नोव्हेंबर महिन्यात घाटकोपर येथे कामराजनगर बस स्थानकाजवळ मोठी जलवाहिनी फुटली. गेल्या महिन्यात चेंबूर पूर्व येथील पोस्टल कॉलनी आणि कुर्ला स्थानक जंक्शन येथे जलवाहिनी फुटली. संबंधित प्राधिकरणांना भूमिगत जलवाहिन्यांचा आराखडा देण्यात आला आहे. त्यामुळे या दुर्घटना टाळता येऊ शकल्या असत्या, असे जल अभियंता खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून ही दंडाची रक्कम वसूल होणार आहे़
असा आकारणार दंड
आॅगस्ट महिन्यात कुर्ला पूर्व जलवाहिनी फुटली होती. या प्रकरणी दोन लाख ६५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये घाटकोपर येथील कामराजनगर बस स्टॉप येथील मोठी जलवाहिनी फुटल्याप्रकरणी एक लाख १७ हजार रुपयांचा, तर चेंबूर पूर्व, पोस्टल कॉलनी आणि कुर्ला जंक्शन जलवाहिनांसह इतर छोट्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमध्ये ११ लाख ३२ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.