मेट्रो चार कारशेडला घ्यावा लागेल यू टर्न; कांजूर कारशेडला अनिश्चिततेचा ब्रेेक लागल्याने अडचणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:20 AM2020-12-19T02:20:23+5:302020-12-19T06:51:35+5:30
आरे काॅलनी येथील मेट्रो तीनचे कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर वडाळा - गायमुख या मेट्रो चारचे कारशेडही मोगरपाड्यातून कांजूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.
मुंबई : आरे काॅलनी येथील मेट्रो तीनचे कारशेड कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर वडाळा - गायमुख या मेट्रो चारचे कारशेडही मोगरपाड्यातून कांजूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. आता कांजूरचे कारशेड अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर मेट्रो चारच्या कारशेडलाही पुन्हा यू टर्न घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत.
वडाळा ते कासारवडवली (मेट्रो - ४) आणि कासारवडवली ते गायमुख (४ अ) या मार्गावरील मेट्रोसाठी कारशेड उभारणीचे प्रयत्न गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहेत. त्यासाठी सर्वप्रथम ओवळा येथील जागा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांचा विरोध, त्याला मिळालेले राजकीय नेत्यांचे पाठबळ आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या मुद्द्यावर एमएमआरडीएने हा पर्याय बाजूला ठेवला. त्यानंतर मोगरपाडा येथील ४२ एकर जागेवर कारशेड प्रस्तावित करण्यात आले. मात्र, तिथेही स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींचा विरोध असून सरकारी यंत्रणांना येथील जागेचे मोजमाप करू दिले जात नाही.
पर्यावरणाच्या मुद्द्यावर मेट्रो तीनची कारशेड कांजूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर मेट्रो चारचे कारशेडही तिथेच होईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले होते. त्यामुळे मेट्रो चारच्या मोगरपाडा येथील कारशेडच्या कामांसाठी काढलेल्या निविदांची प्रक्रियासुद्धा थांबविण्यात आली होती.
न्यायालयाने कांजूरची जागा हस्तांतराच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तिथे सुरू केलेल्या कामाला स्थगिती दिल्यानंतर केवळ मेट्रो तीनच नव्हे, तर मेट्रो चारचे कारशेडही अडचणीच सापडले आहे.
...त्यानंतरच ठरणार पुढील दिशा
मेट्रो तीनसाठी बीकेसी येथील बुलेट ट्रेनची जागा देण्याचा पर्याय सरकारने पुढे केला आहे. मात्र, त्या ठिकाणी मेट्रो चारचे कारशेड करणे अशक्य आहे. त्यामुळे कांजूरमार्ग नसेल तर मेट्रो चारसाठी पुन्हा मोगरपाड्याचा पर्याय स्वीकारण्याशिवाय एमएमआरडीएला पर्याय नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर कांजूरच्या जागेबाबतचा न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येताे, हे समजल्यानंतरच पुढील दिशा ठरविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.