- रोहित नाईकमुंबई : मुंबईमध्ये सध्या मेट्रोचे काम जोरात सुरू असताना त्याचा फटका मुंबई क्रिकेटला बसत आहे. आझाद मैदानातील बहुतेक भाग मेट्रो उभारणीसाठी एमएमआरडीएने घेतल्याने या जागेच्या पर्यायासाठी दुसरी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली, अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी लोकमतला दिली.मुंबई क्रिकेटच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी पवार यांच्यासोबत एमसीएचे विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार, उपाध्यक्ष विनोद देशपांडे, उपाध्यक्ष पंकज ठाकूर, संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांचीही उपस्थिती होती.एमसीएने आझाद मैदान परिसरातील भाडेपट्ट्यावर घेतलेल्या सर्व मैदानांची मुदत २०१८ साली संपत असून त्यावर मार्ग काढण्यासाठी एमसीए पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असेही देशपांडे म्हणाले. त्याचप्रमाणे, आझाद मैदान परिसरातील मैदानांच्या पर्यायी जागांकरता नवी मुंबईतील पाहणी केलेल्या मैदानांना संमती मिळण्याबाबतही चर्चा झाल्याचे देशपांडे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमसीए पदाधिकाऱ्यांना जागेबाबत नक्की प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली. याचाच अर्थ भविष्यात मुंबई क्रिकेट नवी मुंबईला हलविले जाऊ शकते.
'मेट्रो'चा फटका मुंबई क्रिकेटला, शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:11 AM