मेट्रो हाऊस इमारतीला टाळे ठोकले
By admin | Published: June 4, 2016 03:01 AM2016-06-04T03:01:38+5:302016-06-04T03:01:38+5:30
पुरातन वास्तू व लाकडी बांधकाम असलेली कुलाबा येथील मेट्रो हाऊसची इमारत भीषण आगीमुळे खिळखिळी झाली आहे़ त्यामुळे सावधगिरी म्हणून म्हाडाने या उपकरप्राप्त इमारतीला आज
मुंबई : पुरातन वास्तू व लाकडी बांधकाम असलेली कुलाबा येथील मेट्रो हाऊसची इमारत भीषण आगीमुळे खिळखिळी झाली आहे़ त्यामुळे सावधगिरी म्हणून म्हाडाने या उपकरप्राप्त इमारतीला आज सील ठोकले़ तसेच या इमारतीच्या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट तत्काळ करून घेण्यासाठी संबंधित मालकाला नोटीसही बजाविण्यात आली आहे़
१४८ वर्षे जुन्या असलेल्या मेट्रो हाऊसला लागलेली आग अग्निशमन दलाने नौदलाच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली़ तर मेट्रो हाऊसच्या ए, बी व सी अशा तीन विंगमध्ये पसरलेली ही आग आज दुपारी २़५७ ला पूर्णपणे विझली़ दुर्घटनेवेळी या परिसरातील सर्व रहिवासी, गाळेधारक व फेरीवाल्यांना येथून तत्काळ हटविण्यात आले होते़ मात्र ही इमारत आगीनंतर सुरक्षित नसल्याने फेरीवाले येथे परतू नयेत, म्हणून काळजी घेण्यात येत आहे़ कुलाबा पोलीस ठाण्यात डायरी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. आगीमागचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
स्ट्रक्चरल आॅडिट संपेपर्यंत प्रवेशबंदी
नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू
करून आठ दिवसांत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण करण्याची सूचना म्हाडाने मेट्रो हाऊसच्या मालकाला केली आहे़ वास्तुविशारद पाटीदार यांच्याशी आॅडिटसंदर्भात चर्चा सुरू
असल्याचे समजते़
या इमारतीमध्ये दहा रहिवासी व ५० व्यावसायिक गाळेधारक आहेत़ या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट होईपर्यंत कोणालाही इमारतीमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही़
इमारत उपकरप्राप्त असली तरी खासगी असल्याने यातील रहिवाशांना त्यांच्या राहण्याची तात्पुरती सोय स्वत:च करावी लागणार आहे़
या परिसरातील फेरीवाल्यांना पालिकेने हटविले आहे़ तसेच ते परत येऊ नयेत, याचीही खबरदारी घेण्यात येत आहे़
इमारतीमध्ये बेकायदा बदल
मेट्रो हाऊस इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बदल केले असल्याचे आढळून आले आहे़ पोटमाळा, जिने आणि काही खोल्या वाढविण्यात आल्या आहेत़ या इमारतीच्या बी विंगला आगीमुळे तडे गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्याचीही तपासणी सुरू आहे.