संदीप शिंदे
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील ३७० किमी लांबीपैकी सध्या काम सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका पुढील पाच वर्षांत तर उर्वरित मार्गिका २०३१ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, वादग्रस्त कंत्राटदार, कारशेडच्या मार्गातील विघ्न, मार्ग बदलाची मागणी, कोरोनामुळे ढासळलेले आर्थिक नियोजन, मजूरांची वानवा, पीपीपी तत्वावरील प्रतिसादाबाबत साशंकता अशा अनेक कारणांमुळे निर्धारित मुदतीत एकही मेट्रो धावणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
२०१४ साली कार्यान्वीत झालेली घाटकोपर अंधेरी वर्सोवा ही मेट्रो तोट्यात असून रिलायन्सच्या विनंतीनंतर ती मार्गिका आपल्याकडे घेण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. डीएन नगर दहिसर आणि दहिसर ते अंधेरी या मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावर आँक्टोबर, २०२० पासून मेट्रो धावेल असे सांगितले जात होते. मात्र, कोरोना संकट आणि कारशेडची जागेचा विलंब आणि मेट्रो सातच्या वादग्रस्त कंत्राटदाराचा बदल यामुळे तो मुहूर्त किमान एक वर्ष लांबणीवर पडला आहे. मानखुर्द – वांद्रे - डी. एन. नगर या मेट्रो (दोन ब) मार्गिकेच्या कामात दिरंगाई करणा-या कंत्राटदारांना एमएमआरडीएने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याला सात महिने लोटल्यानंतरही नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करता आलेली नाही. त्यामुळे रखडलेले ९६ टक्के काम आँक्टोबर, २०२२ या निर्धारित वेळेत पूर्ण करणे अशक्य आहे.
------------------
तीन आणि चारच्या मार्गात कारशेडचे विघ्न
एमएमआरसीएलच्या अखत्यारीत असलेल्या कुलाबा सिप्झ या मेट्रोचे आरे काँलनी येथील कारशेड पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावर जवळपास रद्द झाले आहे. नव्या जागेचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे डिसेंबर, २०२१ पर्यंत पहिला आणि जून, २०२२ पर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्याचे स्वप्नही धुळीला मिळाले आहे. वडाळा ठाणे कासरवडवली – गायमूख या मेट्रो चार आणि चार अच्या कारशेडसाठी मोगरपाडा येथील जागा देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. भूसंपादन झालेले नसतानाही एमएमआरडीएने कारशेडच्या कामांसाठी निविदा काढल्या असल्या तरी विघ्न कायम आहे. त्यामुळे या मार्गावरही आँक्टोबर, २०२२ पर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याची आशाही धूसर आहे.
------------------
पीपीपी प्रतिसादाबाबत शंका
नवी मुंबई आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मेट्रो ८ आणि कांजूरमार्ग आणि बदलापूर ही मेट्रो १४ केंद्र सरकारच्या नव्या मेट्रो पाँलिसीनुसार पब्लिक प्रापव्हेट पार्टिसिपेशन (पीपीपी) तत्वावर उभारली जाणार आहे. मात्र, याच तत्वावरील मेट्रो वनचे संचलन करणारी कंपनी तोट्यात गेली असताना खासगी कंपन्या त्यासाठी पुढाकार घेतील का, याबाबत शंका आहे.
------------------
मार्ग बदलाच्या हालचाली
ठाणे भिवंडी कल्याण ही मेट्रो पाच आँक्टोबर, २०२४ पर्यंत सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे भिवंडी कल्याण परिसरातील मार्ग बदलण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली आहे. ती पूर्ण झाल्यानंतर स्थापत्य कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. कल्याण तळोजा मेट्रोचा (१२) मार्गच चुकीचा असून तो बदलण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आग्रही आहेत.
------------------
प्रकल्पांचे आस्ते कदम
स्वामी समर्थनगर विक्रोळी (मेट्रो ६) या मार्गिकेचे काम जेमतेम १२ टक्के झाले आहे. तर, मेट्रो ९ आणि सात चा विस्तारीत मार्ग ७ अ दहिसर – मीरा – भाईंदर - अंधेरी – विमानतळ या मार्गावरही प्राथमिक कामे सुरू आहे. तर, गायमूख – शिवाजी चौक (मार्ग १०), वडाळा छत्रपती शिवाजी टर्मिनस (११) या मार्गिकांना प्राथमिक मंजूरी मिळाली असून तिथे कामांनी वेग पकडलेला नाही.