मेट्रो - चार मार्गिकेसाठी जर्मनीकडून ४,१५४ कोटींचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 05:49 AM2019-12-17T05:49:34+5:302019-12-17T05:49:48+5:30
मार्गिकेच्या कामाला येणार गती; प्रकल्पासाठी १५,४९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
मुंबई : वडाळा-घाटकोपर या मेट्रो-४ आणि कासारवडवली ते गायमुख या मेट्रो-४ अ या मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य जर्मनीची केएफडब्ल्यू बँक देणार आहे. या बँकेमार्फत ५२५ मिलियन यूरोचे म्हणजेच ४,१५४ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता या मार्गिकेच्या कामाला गती येणार आहे.
मेट्रो-४ आणि मेट्रो-४ अ या मार्गिकांच्या अर्थसाहाय्यासाठी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव नुकतेच जर्मनीला गेले होते. या वेळी त्यांनी जर्मन बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या अर्थसाहाय्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आता ५२५ मिलियन यूरोचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. वडाळा-घाटकोपर-ठाणे- कासारवडवली या मेट्रो-४ मार्गिकेच्या प्रकल्पासाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ही मार्गिका ३२ किलोमीटर लांबीची असून या मार्गिकेमध्ये एकूण ३२ स्थानके बांधण्यात येणार आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई असा प्रवास जलद आणि सोपा होणार आहे.
तर कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ हा २.७ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग-४ मार्गिकेचा विस्तारित मार्ग आहे. या मार्गिकेसाठी ९४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा विस्तारित मार्ग तेथील रहिवाशांच्या मागणीला मान देऊन मंजूर करण्यात आला होता. विस्तृत प्रकल्प अहवालामध्येही येथून दररोज १ लाख ३० हजार प्र्रवासी प्रवास करतील, असा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे. कासारवडवली ते गोविनवाडा आणि गोविनवाडा ते गायमुख दरम्यानचे स्थापत्य काम आणि गोविनवाडा व गायमुख या दोन स्थानकांची स्थापत्य कामे करण्यासाठी आमंत्रित केलेल्या निविदांना मंजुरी देतानाच समितीने मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लि. यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यास मंजुरी दिली.
कंत्राटदारांना ३४२ कोटी रुपये इतके शुल्क देण्यात येणार आहे. म्हणजे या दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून १५,४९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पैकी जर्मनी बँकेकडून ४,१५४ कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे.
२०२२ सालापर्यंत काम पूर्ण करणार
मेट्रो-४ मार्गिकेचे काम २०२२ सालापर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारमार्फत ठेवण्यात आले आहे. या मार्गिकेचे ७० टक्के युटीलिटी वर्क, ३७ टक्के पाईलिंग वर्क आणि २१ टक्के पाईल कॅप वर्क पूर्ण झाले असल्याचे एमएमआरडीएद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही मार्गिकांमुळे इंधन, वेळ यांची बचत होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. तर विस्तारीकरणामुळे प्रवाशी संख्येत आणखी वाढ पडेल अशी एमएमआरडीएला अपेक्षा आहे.