मुंबई - मेट्रो स्थानकात प्रवेश करताच सुरक्षारक्षकांचा असलेला गराडा... स्थानकात असलेले सीसीटीव्ही, मोठ्या प्रमाणात असलेला कर्मचारी वर्ग आणि मेट्रो ट्रेनची होत असलेली देखभाल आणि दुरुस्ती तसेच मेट्रोकडून प्रवाशांना तिकीट दरात देण्यात येत असलेल्या सवलती आणि अगोदरच कमी असलेले तिकीट यामुळे मेट्रो पहिल्या तीन महिन्यांतच गडगडल्याचे चित्र आहे. मेट्रो सुरू होताच पहिल्या तीन महिन्यांत ५७ कोटींचा तोटा मेट्रोला झाल्याचे उघडकीस आले आहे. ४,५०० कोटी रुपये खर्चून ८ जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली. मेट्रो मुंबईकरांच्या पसंतीस उतरावी यासाठी मेट्रोचे भाडे फक्त १० रुपये ठरवण्यात आले. कुठल्याही स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी फक्त दहा रुपये आकारणी केली जात असल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरवासीयांनी मेट्रोचा पुरेपूर आनंद लुटला. महिनाभरासाठी १० रुपये आकारणी असल्याने मेट्रो प्रशासनाला याचा पुरेपूर आर्थिक फायदाही झाला. मेट्रो सुरू झाल्यावर सुरुवातीला रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २ लाख ४० हजार एवढी होती. त्यानंतरच्या काही दिवसांत हा आकडा वाढून ३ लाख झाला. तर शनिवार आणि रविवारी येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने प्रवाशांचा आकडा आणखीच वाढून तो ५ लाख एवढा झाला. त्यामुळे सुरुवातीला मेट्रोतून एक कोटी प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रोला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता मेट्रो प्रशासनाकडून बच्चेकंपनीसाठीही मेट्रो सफर सुरू करत यातून दोन स्थानकांपर्यंतचा प्रवास मोफत देण्यात आला. त्यानंतर वायफाय, स्मार्ट कार्ड सेवा देतानाच ट्रिपमागे (खेप) पैसे मोजण्याची नवीन शक्कल मेट्रोकडून लढवण्यात आली. पहिल्या तीन महिन्यांत अशा नवनव्या शक्कल लढवताना अवाढव्य खर्चालाही तोंड द्यावे लागले. त्याचप्रमाणे सुरुवातीपासून कमी असलेले तिकीट दर आणि त्यातच देण्यात येणाऱ्या सवलती तसेच मेट्रो ट्रेनची होणारी देखभाल आणि दुरुस्ती या सर्व कारणांमुळे मेट्रोला पहिल्या तीन महिन्यांतच ५७ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे मेट्रोतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मेट्रोला ५७ कोटींचा तोटा
By admin | Published: December 04, 2014 1:28 AM