लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या वर्षात ‘एमएमआरडीए’मार्फत ४ नव्या मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यामुळे ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. ‘एमएमआरडीए’ने हाती घेतलेली मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून तिच्यावर १५ स्थानके असतील. यासाठी १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार होणार आहे. मेट्रो ५ मार्गिका कल्याण येथून दुर्गाडीपर्यंत आणि तेथून उल्हासनगरपर्यंत नेली जाणार आहे. मीरा रोड येथील शिवाजी चौक येथून विरारपर्यंत जाणाऱ्या मेट्रो १३ तसेच गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार आहे.
या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार
- ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन जंक्शनपर्यंतचा भुयारी मार्ग.
- फाउंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग.
- ऐरोली बोगदा ते कटाई नाका रोड (भाग ३) ६.७१ किमीचा रस्ता.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील कामे
कुळगाव बदलापूरमध्ये कात्रप ते बेलावली बदलापूरदरम्यान आरओबी बांधणे.कात्रप पेट्रोलपंप ते खरवई जुवेलीपर्यंत सीसी रस्त्याचे बांधकाम.
हे आहेत मेट्रो प्रकल्प
- मेट्रो मार्ग ५ चा विस्तार - दुर्गाडी (कल्याण) ते उल्हासनगर.
- मेट्रो मार्ग १० - गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड)
- मेट्रो मार्ग १३ - शिवाजी चौक (मीरा रोड) ते विरार.
- मेट्रो मार्ग १४ - कांजूरमार्ग-बदलापूर.
वसई-विरारमध्ये रिंगरोड
- वसई-विरार क्षेत्रातील रस्ते, खाडीवरील पूल व रेल्वे उड्डाणपुलांची कामे.- वसई-विरार भागातील ४ प्रमुख शहरे व सभोवतालच्या गावांना जोडणारा ४० मी. रुंदीचा रिंगरोड.- वसई-विरार शहर हद्दीतील ५ रेल्वे ओव्हर ब्रीज कामांचे बांधकाम.
मीरा भाईंदरमध्ये उड्डाणपूल
सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तनपर्यंत रस्ता तयार करणे. मीरारोड पूर्व- पश्चिम उड्डाणपूल बांधणे.