मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ, 2 लाखांचा टप्पा ओलांडला! निर्बंध शिथिल झाल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:38 PM2021-12-16T16:38:18+5:302021-12-16T16:39:01+5:30
कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी मेट्रोमधून सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करत होते.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना आता निर्बंधही शिथिल होत आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रवासी संख्येत वाढ झाली असून मुंबई पुन्हा वेगाने धावू लागली आहे. त्यामुळेच वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो वनने आता दोन लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे.
राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या अथक प्रयत्नांनी कोविडचा धोका कमी होत आहे. आता ओमायक्रॉनचा धोका वाढत असला तरी निर्बंध पाळण्याचे आवाहन सरकार करत आहे.
दुसरीकडे अनलॉकनंतर मुंबई पुन्हा एकदा वेगवान झाली आहे. याचा परिणाम म्हणून बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यापैकी एक असलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्यावहिल्या मेट्रो वनने आपला दोन लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे.
- कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी मेट्रोमधून सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करत होते.
- डिसेंबरच्या शेवटपर्यंत मेट्रोची प्रवासी संख्या दोन लाख २५ हजार होईल, असा दावा केला जात आहे.
- कोरोना काळात २२ मार्च ते १८ ऑक्टोबर २०२० या काळात म्हणजे २११ दिवस मेट्रो बंद होती.
- कोरोना काळात जेव्हा मेट्रो सुरू झाली. त्यावेळी पहिल्याच दिवशी मेट्रोमधून १२,७३८ प्रवाशांनी प्रवास केला.
- कालांतराने मेट्रोची प्रवासी संख्या १ लाखांवर पोहोचली.