मेट्रो लावणार २०,९०० झाडे, वृक्षतोडीची होणार भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:11 AM2018-06-07T02:11:54+5:302018-06-07T02:11:54+5:30
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन २०,९०० वृक्षांचे रोपण करणार आहे. मेट्रोच्या कामावेळी केलेल्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
मुंबई : बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन २०,९०० वृक्षांचे रोपण करणार आहे. मेट्रोच्या कामावेळी केलेल्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मेट्रो कॉर्पोरेशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यात नुकताच या संदर्भात सामंजस्य करार झाला. या करारात नमूद केल्याप्रमाणे मेट्रो या भागात वृक्षांचे रोपण आणि त्या वृक्षांची ७ वर्षे देखभाल करणार आहे.
वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीनुसार, या वृक्षारोपणासाठी उद्यानातील १९ हेक्टर जमीन वापरण्यात येणार आहे. ही जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने ठरवून दिलेली आहे. एमएमआरसीचा हा उपक्रम संयुक्त सामाजिक दायित्व अंतर्गत आहे. वृक्षतोडीची भरपाई म्हणून १०,४५० झाडे आणि सामाजिक दायित्वांतर्गत उर्वरित झाडे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून, मौजे: मालाड (मतंगज जवळ) आणि मौजे:आकुर्ली (दामू/भीमनगर) येथील जमीन एमएमआरसीला दिली आहे.
वृक्षारोपणाचा हा स्तुत्य उपक्रम आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासोबत राबवत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. एक वृक्षतोड केल्यास ३ रोपट्यांची लागवड करणे वृक्ष प्राधिकरणाच्या नियमानुसार अपरिहार्य आहे, पण एमएमआरसी त्यापेक्षा कधीतरी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करणार आहे, अशी प्रतिक्रिया एमएमआरसीएच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांनी दिली.
या झाडांची करणार लागवड
- या उपक्रमात आकाशनीम, बेल, चाफा, जंगली बदाम, साग, सप्तरंगी, सिंगापूर चेरी, तमन आणि उंदी या देशी प्रजातींबरोबरच इतर प्रजातींची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि एमएमआरसीच्या संबंधित अधिकाºयांनी वेळोवेळी पाहणी करून, या उपक्रमाची व्यवहार्यता तपासली आहे. आत्तापर्यंत वृक्षारोपणासाठी ५,००० खड्डे खोदण्यात आले असून, जूनअखेरीस या उपक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे.