'मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात; कारशेडच्या आडून आरेतील जागेवर डोळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:57 PM2019-09-17T14:57:53+5:302019-09-17T14:58:45+5:30
देशाचे पंतप्रधान पर्यावरणच्या मुद्दावर मोठे वकील बनले आहेत. हा परिसर संवेदनशील असुन मुंबईकरांच्या आरोग्य आणि भविष्याचा प्रश्न आहे अशी मुंबईकरांची भावना आहे
मुंबई - आरेत होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या प्रकल्पावरुन दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने आरे कॉलनी ही अति संवेदनशील जागा आहे. मुंबई शहारातील आरेच्या जागेवर खूप जणांचा लोकांचा डोळा आहे. या प्रकल्पामुळे मुंबईची लोकसंख्या वाढणार असून आरे कॉलनीत कारशेड आणून घूसखोरी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी पर्यावरण केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, 12 वर्ष याठिकाणी मी स्वतः काम केले आहे. प्रधानमंत्री बोलतात एक आणि करतात एक. मी आता पर्यावरण मंत्री नाही. त्यामुळे हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न करू शकतो. आरे कॉलनी हा अति संवेदनशील झोन घोषित करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचसोबत आम्ही शिवसेनेविरोधात नेहमीच लढत आलोय पण पर्यावरणच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे प्रकल्पाच्या विरोधात बोलले हे महत्वाचे आहे असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, पर्यावरणच्या मुद्द्यावर फक्त बोलून चालणार नाही तर कृती अंमलात आणली पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही. विकास झाला पाहिजे परंतु सुनियोजित हवा. पर्यावरण आणि विकासांच्या दरम्यान संतुलन असले पाहिजे. मेट्रो प्रकल्पामुळे जीवसृष्टी धोक्यात येणार आहे. सरकार लोकांची दिशाभूल करतेय असा आरोप जयराम रमेश यांनी केला.
देशाचे पंतप्रधान पर्यावरणच्या मुद्दावर मोठे वकील बनले आहेत. हा परिसर संवेदनशील असुन मुंबईकरांच्या आरोग्य आणि भविष्याचा प्रश्न आहे अशी मुंबईकरांची भावना आहे. हा विकास नसून दबाव तंत्राचा वापर करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. बीजेपीतील काही लोक सांगतात, पर्यावरण बद्दल तुमची विधान बरोबर आहे. पण आम्ही सरकारच्या विरोधात काही बोलू शकत नाही. पर्यावरणाला छेडणारा विकास आम्हाला नको आम्हाला संतुलित विकास हवाय. ज्या ठिकाणी 12 वर्ष राहिलो, मात्र त्यात आता खुप बदल झाला आहे. पवई परिसरातील डोंगर, नद्या, तलाव यांच्यात बदल झाला आहे. पुढल्या येणाऱ्या सरकारने या मुद्द्यावर पुर्नविचार करावा, अशी मागणी जयराम रमेश यांनी यावेळी केली