मुंबई : मेट्रो कारशेड आरेमधून कांजूर मार्गला हलविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्प चार वर्षे रखडणार असून पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना केली.मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, प्रश्न वैयक्तिक इभ्रतीचा करू नका. राज्याचे हित बघा. मेट्रो कारशेडसाठी आधीच १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. कांजूरमार्गचा पर्याय आमच्यासमोरही होता, पण तिथे अडचणी होत्या, तीन हजार कोटी रुपये भरावे लागणार होते. तेथील जमीन खासगी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. आता न्यायालयानेही सरकारला फटकारले आहे. कांजूरमार्गचा पर्याय निवडल्याने जादाचा जो खर्च येणार आहे तो राज्य सरकारला सोसावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करणारी जायका कंपनी जादाचा खर्च देणार नाही, केंद्र सरकारही हा खर्च देणार नाही. कांजूरमार्गच्या जागेवर पर्यावरणवाद्यांनीही आक्षेप घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.‘प्रकरण न्यायप्रविष्ट नाही’ कारशेडचा विषय न्यायप्रविष्ट आहे म्हणून सभागृहात चर्चा करता येणार नाही, असे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब म्हणाले. पण ही केस अॅडमिशनच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे ती न्यायप्रविष्ट नाही, असे सांगत फडणवीस यांनी बोलणे सुरूच ठेवले.
कांजूरच्या निर्णयाने मेट्रो प्रकल्प चार वर्षे रखडणार- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 2:40 AM