Join us

प्रवाशांच्या सेवेस सज्ज! पश्चिम उपनगरात पुढील महिन्यापासून मेट्रो धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 1:01 PM

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मार्गांवर वेगाने मेट्रोच्या चाचण्या सुरू आहेत. आता येथे धावत असलेल्या मेट्रोची सुरक्षा चाचणीही झाली आहे.

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो प्रकल्प राबविले जात असून, येथील अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो - ७ आणि दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर या मेट्रो - २ अ चा पहिला टप्पा महिनाभरात सुरू होणार आहे. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनीच हा विश्वास व्यक्त केला असून, मुंबई महानगर प्रदेशातील उर्वरित मेट्रोची कामेदेखील वेगाने सुरू आहेत, असा दावाही आयुक्तांनी केला आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मार्गांवर वेगाने मेट्रोच्या चाचण्या सुरू आहेत. आता येथे धावत असलेल्या मेट्रोची सुरक्षा चाचणीही झाली आहे. तर रुळांची सुरक्षा चाचणी काही बाकी आहे. हे सगळे झाले की मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने याबाबतचे प्रमाणपत्र दिले की, मग पश्चिम उपनगरांतील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावेल.

पहिल्यांदा मेट्रो  कुठे धावणार? मेट्रो ७ : आरे ते दहिसर पूर्वमेट्रो २ अ : दहिसर ते डहाणूकरवाडी

मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएचा मेट्रोसाठी मास्टर प्लान आहे. ३३७.१ किमी एवढे मेट्रोचे जाळे असणार आहे. एकूण १४ मेट्रोमार्ग असणार आहेत. यामधील वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो धावत आहे.

कशी सुरू आहेत मेट्रोची कामे?मेट्रो ४ व मेट्रो ५ साठी ठाण्यात जागा निश्चित करण्यात आली आहे. मेट्रो ४ चे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. मात्र, कंत्राटदारामुळे हे काम विलंबाने सुरू आहे. मेट्रो ९ करिता मीरा-भाईंदर येथे जागा निश्चित करण्यात आली. डी.एन.नगर ते मंडाले या मेट्रो २ ब चे कामदेखील ५० टक्के झाले आहे.

टॅग्स :मेट्रो