पश्चिम उपनगरात मेट्रो धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:05 AM2021-06-01T04:05:52+5:302021-06-01T04:05:52+5:30
आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज; चाचणीला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : निळ्याभाेर आकाशात पहाटे दाटून आलेल्या ढगांमध्ये ...
आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज; चाचणीला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निळ्याभाेर आकाशात पहाटे दाटून आलेल्या ढगांमध्ये दडलेला पाऊसही मेट्रोच्या चाचणीसाठी सज्ज झाला आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत चाचणीसाठीची मेट्रो पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी न्हाहून निघत आकुर्ली स्थानकावर दाखल झाली. झेंडूच्या फुलांसह तुतारीच्या निनादाने तिचे स्वागत होत असतानाच तिची छबी टिपण्यासाठी कॅमेरेही सज्ज झाले हाेते. आकुर्ली स्थानकालगतच्या रहिवासी, व्यावसायिक इमारतींसह पश्चिम द्रुतगती मार्गावर दाखल गर्दीचे डोळे मेट्रोच्या चाचणीकडे लागले हाेते. दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकुर्ली स्थानकावर हिरवा झेंडा दाखविल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटासह भोंगा वाजला आणि मेट्रो चाचणीसाठी धावली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्ग उभारण्यात आले असून, भविष्यात या दोन्ही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोची चाचणी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडली. यावेळी मेट्रोच्या आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज चढविण्यात आला होता. फलाटावर चाचणीसाठीची मेट्रो दिमाखात उभी होती. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानकावर दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवताच ती चाचणीसाठी धावू लागली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी म्हणाले की, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहीसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येईल. चालकविरहीत, ऊर्जा वाचविणारी, पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल, अशी या मेट्रोची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बीईएमएल, बंगळुरु हे हिटाची, जपान यांच्या तांत्रिक सहकार्याने मेट्रोचे सेट तयार करत आहेत. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करता हे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असेल.
* भाजपने दाखवले काळे झेंडे
मेट्राे चाचणीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर निषेधाचे फलक दाखवून घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे तसेच आडमुठ्या धोरणांमुळे प्रकल्पाची किंमत तब्बल आठ हजार कोटींनी वाढली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून चाचणी मार्गिकांचे उद्घाटन करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला, असा आराेप यावेळी भातखळकर यांनी केला. आरेमध्ये डेपो झाला असता तर आज कुलाबा-सिप्झ मेट्रो धावताना दिसली असती, परंतु ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळेच अद्याप केवळ चाचण्या सुरू आहेत. कोरोना संकटकाळात मेट्रो उद्घाटनाच्या ठिकाणी लेजर शो, आकुर्ली मेट्रो स्टेशन फुलांच्या माळांनी सजविणे आणि प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रमाच्या जाहिराती देत काेट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा तो पैसा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेसाठी वापरता आला नसता का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
..............................................................