मुंबई- मेट्रो प्रवाशांना मुंबईमेट्रो वनने गणपती भेट दिली असून वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्या येत्या सोमवार 24 सप्टेंबरपासून वाढविण्यात येणार आहेत. सध्या सुरु असलेल्या या फेऱ्या 396 वरून आता 440 होणार आहेत. तर, दर सोमवार ते शुक्रवारी ही सेवा मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध राहिल. त्यामुळे पूर्वीच्या 8 मिनिटांऐवजी मट्रो रेल्वेसेवा ही दर 5 मिनिटांनी सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 या वेळेत मेट्रो प्रवाशांना उपलब्ध होईल.
मुंबई मेट्रोच्या या निर्णयामुळे गर्दीच्यावेळी पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मेट्रोचा पर्याय उपलबध असेल आणि विशेष म्हणजे या वेळेत दर 5 मिनिटांनी मेट्रो रेल्वे सेवा प्रवाशांना उपलब्ध असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने लोकमतशी बोलताना दिली. या 44 फेऱ्यांचा फायदा मेट्रोच्या सुमारे 66,000 अतिरिक्त प्रवाशांना होणार असून त्यांचा या फेऱ्यांमुळे 3 मिनिटे वेळ देखिल वाचणार असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, सध्या सणांचे दिवस लक्षात घेता मेट्रोने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा वाढता कल लक्षात घेता, ही सुविधा मुंबई मेट्रो वनने उपलबध करून दिली आहे. विशेष म्हणजे बुधवारीच याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, या नवीन 44 वाढीव फेऱ्या येत्या 24 सप्टेंबर पासून मेट्रो प्रवाशांना उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली.