Join us  

मेट्रोची धाव भिवंडीपर्यंत, पहिल्या टप्प्याचे ७० टक्के काम झाले पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 5:41 AM

मेट्रो ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी देणार आहे.

मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ च्या मार्गिकेतील ठाणे ते भिवंडी दरम्यान १२.७ किमीचा पहिला टप्पा प्रगतिपथावर आहे. यामध्ये एकूण ६ उन्नत स्थानके असणार आहेत. या टप्प्यातील स्थानकांची ६४ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत तर एकूण ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी देणार असून, प्रवासाच्या वेळेत साधारणतः २० मिनिटांची बचत होणार आहे.

मेट्रो मार्ग ५ मध्ये कशेळी येथे ५५० मीटर लांबीची खाडी आहे. खाडीवर पूल उभारण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकूण १३ स्पॅन उभारण्यात येणार आहेत. सद्य स्थितीत ८ स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रत्येक स्पॅनची लांबी सुमारे ४२ मीटर आहे. मेट्रो ५ च्या पहिल्या टप्प्यात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा व धामणकर नाका (भिवंडी) या स्थानकांचा समावेश आहे.

मेट्रो ५ साठी कशेळी येथे सेंट्रलाइज्ड डेपोकरिता जागा निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गिकेतील अंजूरफाटा येथे रेल्वे ओव्हर ब्रिजकरिता स्पेशल स्टील गर्डर स्पॅन  बसवण्यात येणार आहेत. ज्याचे काम लवकरच सुरू होईल.एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

टॅग्स :भिवंडीमेट्रो