नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार; पाठपुराव्याला आलं यश

By मनोहर कुंभेजकर | Published: October 13, 2023 08:14 PM2023-10-13T20:14:08+5:302023-10-13T20:15:34+5:30

लोकोपयोगी निर्णयासाठी नागरिकांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Metro services will continue till 12 midnight during Navratri festival | नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार; पाठपुराव्याला आलं यश

नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार; पाठपुराव्याला आलं यश

लोकमत इम्पॅक्ट, मनोहर कुंभेजकर

मुंबई: हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण रविवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. आपल्या या पाठपुराव्याला यश आले असून तसा निर्णय प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. लोकमत ऑनलाईन आणि लोकमतने देखिल या संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते.

आजच प्रशासनाकडून नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२.२० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकसेवेबाबत किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.  

रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम सुरु असतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Metro services will continue till 12 midnight during Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.