Join us

निवडणुकीसाठीच मेट्रोचा दिखावा- संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:58 AM

मेट्रोच्या नावाखाली मुंबईभर रस्ते खोदण्यात आले असले, तरी हा निव्वळ देखावा आहे.

मुंबई : मेट्रोच्या नावाखाली मुंबईभर रस्ते खोदण्यात आले असले, तरी हा निव्वळ देखावा आहे. काम सुरू आहे,े याचा आभास निर्माण करण्यासाठी पत्रे टाकून रस्ते अडविण्यात आले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा सरकारने मुंबईकरांना वेठीस धरल्याचा आरोप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. मुंबईत मेट्रो २ अ, २ इ, मेट्रो ४, ६ आणि ७ ची कामे सुरू आहेत. २०१६ साली या मेट्रोची घोषणा करताना २०१९ पर्यंत मेट्रो २ अ आणि इ कार्यान्वित होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. आता २०२२ची तारीख दिली जात आहे. प्रत्यक्षात पाचपैकी एकाही मेट्रोचे काम सुरू नसून, २०३० पर्यंत यातील काहीच कार्यान्वित होणार नाही. सरकारने मेट्रो स्थानकांसाठी अद्याप कुठेच जमीन अधिग्रहीत केलेली नाही. निवासी इमारती, पवई लेकसारख्या पर्यटकांची ये-जा असणाऱ्या दोन-दोन मेट्रो स्थानकांचा घाट घातला आहे. मुंबईत भुयारी मेट्रोचे जाळे उभारण्याची आवश्यकता असताना, सरकार मात्र मनमानी पद्धतीने मेट्रोबाबत निर्णय घेत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. या वेळी मेट्रोचे अभ्यासक नितीन किलावाला यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित होते.अनेक ठिकाणी मेट्रो मार्ग एकमेकांना समांतर जातात. काही ठिकाणी रेल्वे रूळ आणि पूल आडवे आहेत. काही ठिकाणी उच्च दाबाच्या विद्युत तारा ओलांडाव्या लागतील. चुकीच्या नियोजनामुळे केवळ उपनगरातच ७०-८० इमारती पाडाव्या लागतील. तब्बल ५० हजार कोटींचा हा प्रकल्प सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सर्वांगीण विचार करत मेट्रोच्या आराखड्यात बदल करावेत, तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.>प्रदूषण वाढणारमेट्रोचे अभ्यासक नितीन किलावाला यांनी संपूर्ण मुंबईला सरकारने बांधकामाचे साइट बनवून टाकले आहे. कोस्टल रोड, मेट्रो प्रोजेक्ट्स आणि पुतळे यामुळे सगळीकडे खोदकाम आणि बांधकाम सुरू आहे. मागे दिल्लीतही असाच प्रकार घडला. दिल्लीतल्या १८० किलोमीटर मेट्रोमुळे गेल्या तीन वर्षांत भयंकर प्रदूषण वाढलेले आहे. भविष्यात मुंबईची अशीच अवस्था होणार असल्याची शंका किलावाला यांनी व्यक्त केली.

टॅग्स :संजय निरुपम