मंदिरापासून लांब होणार मेट्रो स्टेशन; सर्वोच्च न्यायालयात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:56 AM2019-01-30T00:56:47+5:302019-01-30T00:57:10+5:30
दक्षिण मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शनवर पारशी समुदायाच्या अग्नी मंदिरापासून २० मीटर लांब मेट्रो-३ प्रकल्पाचे काळबादेवी स्टेशन आता बांधण्यात येणार आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान होणाऱ्या मेट्रो - ३ प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. दक्षिण मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शनवर पारशी समुदायाच्या अग्नी मंदिरापासून २० मीटर लांब मेट्रो-३ प्रकल्पाचे काळबादेवी स्टेशन आता बांधण्यात येणार आहे. सोमवारी मेट्रो-३ प्रकल्पाच्या अधिकाºयांनी सुप्रीम कोर्टात याविषयी माहिती दिली. प्रकल्पात पारशी समुदायाचे हे मंदिर मध्ये येत असल्यामुळे हे मंदिर हटवले जाणार का? याविषयी प्रश्नचिन्ह होते. मात्र मेट्रो-३ प्रशासनाने आता स्थानकाची जागाच बदलल्याने पारशी समाजाला या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शनवरील पारशी समाजाचे श्रद्धास्थान असलेले हे अग्नी मंदिर १८३० साली बांधण्यात आले आहे. मेट्रो-३ प्रकल्प संपूर्णपणे भूमिगत आहे. जेव्हा या प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा या मंदिराच्या खालून दोन मीटर अंतरावर काळबादेवी स्टेशनचे काम होणार होते. मात्र या कामामुळे या मंदिराला धोेका निर्माण झाला असता. या स्टेशनविरोधात जमशेद सुखदवाला यांनी मंदिराच्या खाली सुरुंग खोदण्यासाठी विरोध केला होता.
या स्टेशनच्या कामाविरोधात सुखदवाला यांनी हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यात त्यांनी मंदिरापासून लांब काळबादेवी स्टेशनचे काम व्हावे अशी मागणी केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने मेट्रो-३ प्रकल्प अधिकाºयांना मंदिरापासून ३.५ मीटर अंतरावर सुरुंग खोदण्याचे आदेश दिले होते. या कामात अग्नी मंदिराला कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश एमएमआरसीला दिले होते.
कामावर झाला होता परिणाम
नोव्हेंबर २०१७ मध्ये जमशेद सुखदवाला यांनी सर्वप्रथम याविरोधात आवाज उठविला होता. अग्नी मंदिराला होणाºया धोक्यामुळे सुप्रीम कोर्टाने काळबादेवी स्टेशनच्या कामावर स्थगिती आणली होती. मात्र यामुळे प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामावर परिणाम होत होता. यामुळे एमएमआरसीच्या अधिकाºयांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात स्टेशनची जागा बदलण्याविषयी माहिती दिली. त्यानुसार आता मंदिरापासून खाली २० मीटर अंतरावर हे खोदकाम होणार आहे.