मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दहिसर ते डी.एन. नगर मार्गावरील मेट्रो-२ अ प्रकल्प, डी.एन. नगर ते मंडाले मार्गावरील मेट्रो-२ ब प्रकल्प आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गावरील मेट्रो ७ प्रकल्प, या सर्व मार्गांवरील एकूण ५२ उन्नत स्थानके इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)च्या ग्रीन एम.आर.टी.एस. मानांकनानुसार विकसित करण्यात येणार आहेत. या स्थानकांचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना हरित प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.आय.जी.बी.सी. संस्था आणि कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री यांनी संयुक्तपणे उपरोल्लेखित निर्णय घेतला आहे. निर्णयांच्या अनुषंगाने पोषक असे अनेक उपक्रम प्राधिकरणामार्फत आधीपासूनच राबविण्यात येत आहेत. यात अजून काही प्रमुख उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार यापुढे हरित स्थानकांवर १०० टक्के एलईडी विजेचा वापर करण्यात येणार आहे. ऊर्जास्नेही उपकरणांचा वापर करून वातानुकूलनावरील भार कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच विजेचा भार किमान राहावा यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर होणार आहे. यात नैसर्गिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे.>सौरऊर्जेचा प्रभावी वापरजिने आणि उद्वाहनांसाठी व्ही.व्ही.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सर्व उन्नत स्थानके, कार डेपोंमध्ये सौरऊर्जेचा वापर होईल. वीज, पाणी आणि सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर असणारे हरित कार डेपो उभारण्यात येणार आहेत.कार्बन निर्माण होऊ न देणारी ब्रेक व्यवस्था, तसेच कोचमध्ये एलईडी आणि ऊर्जास्नेही वीज व्यवस्था आणि किमान वजनाची कोचनिर्मिती प्राधिकरणाकडून यापुढे करण्यात येणार आहे. ही सर्व व्यवस्था जागतिक पातळीवरील गुणवत्तेनुसार राहावी यासाठी प्राधिकरण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
मेट्रोची ५२ उन्नत स्थानके होणार ‘हरित स्थानके’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 1:51 AM