Join us

मेट्रो भुयारी, मुंबईकरांसाठी मौज तिची न्यारी, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 9:51 AM

दक्षिण मुंबईतील कुलाबा भागाची मेट्रोने थेट बीकेसी आणि विमानतळाला जोडणी मिळणार आहे. 

अमर शैला, प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील १२.६९ किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण केले. त्यामुळे तब्बल अडीच वर्षांहून अधिक विलंबानंतर का होईना कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेचा पहिला टप्पा आज, सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या या मार्गिकेचा बीकेसी ते कफ परेड हा पुढील टप्पा एप्रिल २०२५ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहेत. त्यातून दक्षिण मुंबईतील कुलाबा भागाची मेट्रोने थेट बीकेसी आणि विमानतळाला जोडणी मिळणार आहे. 

मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यामुळे सीप्झ एमआयडीसी आणि बीकेसी ही पश्चिम उपनगरातील प्रमुख दोन व्यावसाय केंद्रे जोडली जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ आणि टर्मिनल २ यांनाही या मेट्रोद्वारे जोडणी मिळणार आहे. मेट्रो १ मार्गिकेच्या मरोळ नाका स्थानकालाही मेट्रो ३ मार्गिकेची जोडणी मिळाली आहे. त्यातून मुंबईबाहेरून पश्चिम उपनगरीय रेल्वेने येणारा प्रवासी अंधेरीत उतरून मेट्रो १ ने मरोळ नाका स्थानक गाठून पुढे विमानतळ, बीकेसी अथवा सीप्झकडे जाऊ शकणार आहे. तर, मध्य रेल्वे मार्गावरून येणारे प्रवासी घाटकोपर येथून मेट्रो १ ने प्रवास करून मरोळ नाका येथे येऊ शकतात. तसेच तिथून पुढील प्रवास मेट्रो ३ मार्गिकेवरून करू शकणार आहेत. परिणामी, अनेकांचा रस्ते प्रवास वाचणार असून, रस्त्यावरील कोंडीतून या प्रवाशांची सुटका होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याची अपेक्षा आहे.  

मेट्रो ३ मार्गिकेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याचा दावा ही मेट्रो मार्गिका उभारणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या मार्गावर दरदिवशी ४ लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा आहे. तर, मेट्रो ३ मार्गिकेचा संपूर्ण ३३.५ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यावर सुरुवातीला या मार्गिकेवरून दरदिवशी १३ लाख प्रवासी प्रवास करण्याचा दावा केला जात आहे. परिणामी, मेट्रो मार्गिकेच्या प्रभाव क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूक जवळपास ३५ टक्क्यांनी कमी होईल, असाही एमएमआरसीचा अंदाज आहे. त्यातून वाहनांच्या दरदिवशी ६.६५ लाख फेऱ्या घटून तब्बल ३.५४ लाख लिटर इंधनाची बचत होईल, असेही सांगितले जात आहे. मात्र, पुढील काही महिन्यांनंतरच हे दावे किती प्रत्यक्षात उतरतात याचा अंदाज येऊ शकेल. 

या दाव्यांनुरूप प्रवासी संख्या या मेट्रो मार्गिकेला न मिळाल्यास मोनो मार्गिकेनंतर हा मुंबईतील दुसरा पांढरा हत्ती ठरण्याचा धोका आहे. यामागे या मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी केलेला अवाढव्य खर्च हे कारण आहे.

ही मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी तब्बल ३७ हजार २७५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातील २१ हजार कोटी रुपयांचे कर्ज जपानच्या जायका या वित्त संस्थेकडून घेतले आहे. पुढील काही वर्षांच्या कालावधीत या कर्जाची परतफेड एमएमआरसीला करावी लागणार आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रोच्या संचालनाचा खर्चही अधिक असेल. त्यातून अपेक्षित प्रवासी संख्येपर्यंत मेट्रो मार्गिका पोहोचू न शकल्यास या मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसह या मेट्रोच्या संचालनाचा बोजाही सरकारवर पडेल. 

पर्यायाने हा बोजा करदात्या मुंबईकरांवर येईल. त्यामुळे अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यासाठी बसेसची फीडर सेवा, मल्टी मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून स्थानक परिसरांचा विकास करण्यावरही एमएमआरसीने भर द्यावा.

 

टॅग्स :मेट्रो