भुयारी मेट्रो : कुलाबा-वांद्रे-सीप्झ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत भुयारी मेट्रोच्या कामाने वेग घेतलेला आहे. भुयाराला सिमेंटचे अस्तर लावण्याच्या कामाला प्रारंभ झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्या हस्ते सांताक्रूझ स्थानकाच्या एनएटीएम फलाटाच्या ओव्हर्ट लाईनिंगच्या (भुयाराला सिमेंटचे अस्तर लावण्याच्या) कामाला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी मेट्रो - ३च्या सहार रोड व सीएसएमआयए टी - २ स्थानकांनादेखील भेट दिली.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे मेट्रो - ३ हा भुयारी प्रकल्प उभारला जात आहे. भुयारीकरणाचे ९५ टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे. प्रकल्प पूर्ण होण्याची सर्वसाधारण डेडलाईन डिसेंबर २०२१ किंवा जानेवारी २०२२ आहे. सिव्हील वर्कचा विचार करता, हे काम ७९ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कफ परेड ते सीएसएमटी स्थानकापर्यंतचे भुयारीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले होते. भुयारीकरणाचा हा ३८ वा टप्पा यशस्वीरित्या पार पडला होता. हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा अप-लाईन मार्गाचा ५५७ मीटर भुयारीकरणाचा टप्पा १४९ दिवसांत पूर्ण करण्यात आला होता. या भुयारीकरण टप्प्यासह पॅकेज-१मधील भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले होते.
पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पंप, कंट्रोल रूम तसेच प्रत्येक स्थानकावर आपत्कालिन रिस्पॉन्स टीम, प्रत्येक बांधकाम स्थळावर जेट्टींग मशिन्स आदी यंत्रणा सज्ज आहे. पर्जन्य जल गटारांची सफाई, त्यातील गाळ काढणे यासह सर्व नाले व आजूबाजूच्या परिसराची सफाई करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणारे पंप लावण्यात आले आहेत. ३-५ कामगार यासाठी प्रत्येक स्थानकावर कार्यरत असतील. आपत्कालिन स्थितीत पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यासाठी संपर्क साधण्यात येईल.