मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उभारण्यात येत असून, या दोन्ही मेट्रोची बहुतांशी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परिणामी एकदा का ही सगळी कामे हाता वेगळी झाली की मे महिन्याच्या शेवटच्या म्हणजे याच आठवड्यात पश्चिम उपनगरातील मेट्रो मार्गावर मेट्रोच्या चाचण्या घेतल्या जातील, असा विश्वास प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
मेट्रोच्या चाचण्या वेळेत आणि नीट व्हाव्यात यासाठी प्राधिकरणाने कामाचा वेग वाढवला आहे. त्यानुसार, मेट्रोच्या ७च्या आरे ते दहिसर या टप्प्यातील ओव्हर हेड वायर सोमवारी यशस्वीरीत्या चार्ज करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मेट्रो २ अ च्या चारकोप डेपो ते दहिसरपर्यंतच्या टप्प्यातील ओव्हर हेड वायरला चार्जिंगसाठीची परवानगी मिळाली आहे. मंगळवारी हा टप्पा चार्ज केला जाईल. आणि त्यानंतर हे टप्पे २० किलोमीटरवरील चाचणीसाठी सज्ज असतील, तर दुसरीकडे प्राधिकरणाचे अधिकारीदेखील सातत्याने या कामांवर लक्ष ठेवून आहेत. सोमवारी प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंद राज आणि मेट्रोचे संचालक पी.आर.के मूर्ती यांनी मेट्रो ७ वरील बाणडोंगरी मेट्रो स्थानकाला भेट दिली. शिवाय आगामी मेट्रो चाचण्यांची तयारी तपासली.
------------
मेट्रो २ अ : दहिसर पूर्व ते डीएननगर
मेट्रो ७ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व