मुंबई : डी.एन. नगर ते मानखुर्द मेट्रो-२ ब आणि वडाळा ते कासारवडवली मेट्रो - ४ या दोन्ही प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्गिकांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) थोडा बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून या दोन स्थानकांवर स्थानक बदलण्यासाठी दोन्ही मार्गिकांवर सिद्धार्थ कॉलनी हा एकच थांबा असेल. या ठिकाणी या दोन्ही मार्गिका सिद्धार्थ कॉलनीजवळ एकत्र येणार असल्याने प्रवाशांना या मार्गावर मार्गिका बदलता येणार आहे.
मेट्रो-२ ब मार्गावरील पूर्व द्रुतगती मार्ग हे स्थानक आणि मेट्रो ४ मार्गिकेवरील सिद्धार्थ कॉलनी हे स्थानक एकत्र करण्यात आले आहे. मेट्रो-२ ब ही मार्गिका मेट्रो-२ अ या दहिसर ते डी. एन. नगर मार्गिकेचा विस्तार आहे. दोन्ही मार्गिका मिळून १२ लाख प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे. तर मेट्रो ४ मार्गिकेद्वारे दिवसाला आठ लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. .
प्रवाशांच्या सोयीसाठी निर्णयएमएमआरडीएचे महानगर आयुक्त ए. आर. राजीव यांनी या निर्णयाबाबत सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी या दोन मार्गिकांवर स्थानक बदलण्यासाठी सिद्धार्थ कॉलनी हा एकच थांबा देण्यात आला आहे. मूळ योजनेनुसार मेट्रो २ ब मार्गावर पूर्व द्रुतगती मार्ग हे स्थानक आणि मेट्रो ४ वरील सिद्धार्थ कॉलनी ही स्थानके मार्गिका बदलण्यासाठी ठरवली होती. त्या दोन्हीमध्ये ४८० मीटरचे अंतर होते; पण प्रवाशांच्या सोयीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.