Join us

मेट्रो प्रवास आणखी फास्ट... दर आठ मिनिटांनी धावणार मेट्रो!

By मनोहर कुंभेजकर | Published: January 21, 2023 7:02 AM

प्रवाशांकडून नव्या मार्गावरील मेट्रोचे जंगी स्वागत

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  मुंबईकरांच्या सेवेत नुकत्याच दाखल झालेल्या मेट्रो २अ मुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून शुक्रवारी मेट्रो स्टेशनवर मेट्रोचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रवाशांच्या सेवेसाठी नवी मेट्रो दर ८ मिनिटांनी धावणार आहे.

पश्चिम उपनगरात धावू लागलेल्या मेट्रोमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. मी मालाडला राहतो. ऑफिस अंधेरीला आहे. हा प्रवास करताना माझा दीड तास जात होता. आता मुंबईत माझ्यापेक्षा अधिक खुश कोणी असणार नाही. मेट्रोचे सर्वात पहिले तिकीट मी काढले आहे, असे म्हणत मेट्रोचा पहिला प्रवासी योगेश सोळंकी यांच्यासह उर्वरित अनेक प्रवाशांनी मेट्रोवर स्तुतिसुमने उधळत; मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला.

गुंदवली आणि अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानकावर तिकिटासाठी आणि मेट्रोमध्ये प्रवाशांनी गर्दी केली होती. ईस्ट-वेस्ट मेट्रो कनेक्टिव्हिटी असल्याने अनेकांनी डी. एन. नगर ते गुंदवली, साकीनाका, घाटकोपर असा प्रवास केला. त्यामुळे या स्थानकांवर आणि मेट्रोमध्ये गर्दी दिसत होती.

मेट्रो सुरू झाल्यावर मी दुपारी ४ वाजता डहाणूकर वाडी ते अंधेरी पश्चिम आणि मग डी. एन.नगर ते घाटकोपर असा मेट्रो १ ने प्रवास केला. येताना घाटकोपर-अंधेरी पश्चिम-दहीसर असा प्रवास केला. मेट्रोचा पहिला प्रवास सुखकर व आरामदायी वाटला. या मेट्रो सेवेमुळे वेळ व पैसा वाचेल. खड्यातून वाट काढत असलेला रिक्षा प्रवासाला ब्रेक लागेल. - विलास परब, विरार, प्रवासी

घाटकोपरला काम असल्याने बोरीवली ते अंधेरी आणि अंधेरी ते घाटकोपर परत मेट्रोने बोरीवली प्रवास केला. पहिला मेट्रो प्रवास फार चांगला व सुखकर होता. पश्चिम ते पूर्व जोडले गेल्याने बोरीवली, कांदिवली ते थेट घाटकोपर असा प्रवास सुखकर होईल. -अद्वैत जोशी, बोरीवली पश्चिम, प्रवासी

रोज सुमारे ३ ते ३.५० लाख प्रवासी या मेट्रो ट्रेनने प्रवास करतील. सहा महिन्यांनंतर वाहनांपेक्षा मुंबईकर मेट्रोने प्रवास करतील. एनसीएमसी कार्ड एमएमआरडीए लाँच करणार असून हे कार्ड मट्रो १, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मध्ये चालेल. -एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

टॅग्स :मुंबईमेट्रो