मेट्रो सुटणार सुसाट; १२ मार्गांची कामे प्रगतिपथावर, २०२३ पर्यंत धावणार भुयारी मेट्रो
By सचिन लुंगसे | Published: August 16, 2022 07:53 AM2022-08-16T07:53:35+5:302022-08-16T07:54:16+5:30
Metro : मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईतील धावपळीचे जीवन, लोकलगाड्यांना होणारी गर्दी, भरभरून वाहणाऱ्या बस, गर्दीने फुलणाऱ्या चौपाट्या इत्यादींबाबत कुतूहलमिश्रित आकर्षण सगळ्यांनाच असते. त्यामुळेच सर्व जण मुंबईकडे धाव घेत असतात. ही मायानगरीही सगळ्यांना आपुलकीने सामावून घेते. अशा या महानगरात आता मेट्रोचे जाळे विस्तारू लागले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला जलद मेट्रो सेवा देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत विविध मार्गांवर मेट्रो प्रकल्प हाती घेतले असून, यातील बहुतांश प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. सध्या सुमारे १ कोटी १० लाख नागरिक सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. त्यापैकी ५२ टक्के लोकलने, तर २६ टक्के बसने प्रवास करतात. या प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा, वेळ वाचावा या दृष्टीने २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे.
वेस्टर्न लाइन गतिमान
मेट्रो १ या घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडली गेली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचला असून, प्रवास वेगवान झाला आहे.
पश्चिम उपनगरात मेट्रो - २ या दहिसर पूर्व ते डीएन नगर आणि मेट्रो - ७ या दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या दोन प्रकल्पांतील पहिल्या टप्प्यातदेखील मेट्रो धावू लागल्याने वेस्टर्न लाइन सुपर फास्ट झाली आहे.
आता कुलाबा- वांद्रे - सीप्झ या भुयारी
मेट्रो - ३ कडे आरेमधील कारशेडच्या मुद्द्यावरून सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. डिसेंबर, २०२३ पर्यंत बीकेसी ते सीप्झ या पहिल्या टप्प्यात भुयारी मेट्रो धावू लागेल, असा दावाही करण्यात आला आहे.
भुयारी मेट्रोची वैशिष्ट्ये
मुंबई मेट्रो मार्ग - ३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके आहेत.२०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील. मार्गिका सुरू झाल्यानंतर नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवासाचे विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील.
दहिसर (पूर्व) आणि मीरा-भाईंदर दरम्यान धावणाऱ्या मेट्रो - ९ चे काम वेगाने सुरू असून, येथून दररोज ८ लाख प्रवासी प्रवास करतील.
३८% काम
वडाळा - कासारवडवली या मेट्रो मार्ग ४ चे काम वेगाने सुरू असून, भांडुप आणि मुलुंड परिसरातील काम प्रगतिपथावर असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. पिअर कास्टिंग, पायलिंग, लोखंडी सळ्या बांधणे, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या वळवण्याचे व यू गर्डर लाँचिंगचे काम प्रगतिपथावर असून, प्रकल्पाची एकूण प्रगती ३८ टक्के झाली आहे.