Join us

लिंकरोडची वाहतूककोंडी फोडणार मेट्रो, उपनगरवासीयांचा होणार प्रवास सुकर

By मनोहर कुंभेजकर | Published: January 20, 2023 6:41 AM

या मार्गावर कार्यालये असणाऱ्यांसाठी हा मेट्रो मार्ग अतिशय सोयीस्कर, गारेगार आणि आरामदायी ठरेल

मनोहर कुंभेजकर

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोखले पूल बंद झाल्यापासून पश्चिम उपनगरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. दहीसर ते जूहुपर्यंतच्या प्रवासात तब्बल दोन ते अडीच तास खर्च होत आहेत. रस्त्यांवरचे खड्डे आणि प्रचंड वाहतूक यांमुळे मुलांना शाळेत तर नोकरदारांना कामावर लेटमार्क लागत आहे. मात्र, आता मेट्रोच लिंकरोडची ही वाहतूककोंडी फोडणार आहे. मेट्रो २-अ आणि मेट्रो ७मुळे खास करून पश्चिम उपनगरवासीयांचा प्रवास सुकर होणार आहे. मुंबईकरांना जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, असे आवाहन अनेकदा सरकारकडून करण्यात येते.

आता बेस्ट, लोकल ट्रेनच्या जोडीने विविध भागांत मेट्रो धावणार असून, त्या सेवेचा लाभही मुंबईकरांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून रस्त्यावरची वाहतूक कमी होईल. सध्या आरे ते डहाणूकर वाडी आणि डहाणूकर ते आरे या मार्गावर मेट्रो झोकात धावत आहे. पुढे डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि आरे ते गुंदवली अशी मेट्रो २-अ आणि मेट्रो ७ धावणार असून, या मार्गावर कार्यालये असणाऱ्यांसाठी हा मेट्रो मार्ग अतिशय सोयीस्कर, गारेगार आणि आरामदायी ठरेल, असेही एमएमआरडीएने म्हटले आहे.

मेट्रो २ आणि ७ सेवेला बेस्टतर्फे पूरक बससेवा 

पश्चिम उपनगरात मेट्रो - २ ए आणि मेट्रो - ७ या मेट्रो रेल्वे सेवा आता दहिसर पूर्व ते डी. एन. नगर अंधेरी पश्चिमपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे. तसेच मेट्रो-७ सेवासुद्धा गुंदवली ते अंधेरी (पूर्व) प्रयत्न विस्तार होत आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही मेट्रो स्थानकांदरम्यान सद्य:स्थितीत उपलब्ध बेस्ट उपक्रमाच्या बससेवेव्यतिरिक्त काही नवीन बससेवा २० जानेवारीपासून सुरू करण्यात येत असल्याचे बेस्ट प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले. 

मेट्रो -२ ए मेट्रोसाठी बसमार्ग ए- २९५ हा बसमार्ग सुरू करण्यात येत आहे. मार्ग काय?

शांती आश्रम आणि चारकोपदरम्यान एक्सर, बोरिवली मेट्रोरेल स्थानक, गोराई आगर, चारकोप, पहाडी या मार्गांवर बेस्टची ही नवीन बस धावणार आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो