मेट्रोचे काम, व्यवसाय ५० टक्के जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:28 AM2018-12-17T02:28:29+5:302018-12-17T02:29:06+5:30
पादचाऱ्यांसह वाहतुकीला फटका : नागरिक, व्यावसायिकांमध्ये नाराजी, काम पूर्ण करताना पर्यावरणाचा समतोल बिघडवला
मुंबई : मुंबईमेट्रो प्रकल्प हा या शहरातील वाहतूककोंडीवर एक पर्याय आहे़ मात्र, हा पर्याय उभा राहत असताना रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे़ वाहतूककोंडी प्रचंड वाढली आहे़ रस्त्यावर ठेला लावून पोट भरणाºयांच्या व्यवसायावर गदा आली आहे़ रस्त्याच्या कडेला लागून असलेली दुकाने, हॉटेल्स् यांनाही या कामाचा फटका बसत आहे़ शेकडो झाडांची कत्तल झाल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे़ त्यामुळे भविष्यात हा पर्याय सुखदायी ठरणार असला, तरी त्याच्या निर्मितीच्या यातना नागरिकांना भोगाव्या लागत आहेत.हा प्रकल्प उभारताना नेमका कसा फटका बसतो आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा़़़
अजय परचुरे
मुंबई : मुंबईतील वाहतूक गतिमान करण्यासाठी मेट्रोचं जाळं संपूर्ण मुंबईभर पसरलं आहे. मुंबईत कुलाब्यापासून ते दहिसरपर्यंत ठिकठिकाणी मुंबई मेट्रोच्या प्रकल्पाचं काम सुरू आहे. या मेट्रो प्रकल्पांमुळे मुंबईकरांना वाहतूकीसाठी एक नवीन पर्याय काही वर्षात सुरू होणार आहे खरा, मात्र या मेट्रो प्रकल्पांच्या कामांमुळे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांवरील दुकानदार, अधिकृत फेरीवाले, रस्त्यांवरील विक्रेते यांच्यावर मात्र संक्रांत आली आहे. कुलाबा,दादर भागातील प्रसिद्ध व्यावसायिक, वर्तमानपत्र विक्रेते, वडापाव व्यावसायिक यांच्यात मेट्रोने आपल्या कामांमुळे लावलेल्या बॅरिकेटसमुळे त्यांच्या धंद्यावर फरक पडला आहे. मालाची विक्री अर्ध्यावर आल्यामुळे हे दुकानदार,विक्रेते सध्या मेट्रो प्रशासनावर प्रचंड नाराज आहेत.
शिवसेना भवनाच्या विरुद्ध दिशेला गोखले मार्गावर मेट्रो-३ चे दादर स्थानक असणार आहे. मात्र या कामासाठी रस्त्यावरील पाम व्हयू जगजीवन निवास, हॅपी डोअर या इमारतींच्या तळमजल्यात असणाºया विक्रेत्यांवर रडायची पाळी आली आहे. या मार्गावर मेट्रो ३ च्या कामांमुळे रस्त्याच्या दुतर्फा दुकानांच्या पाट्यांपर्यंत मेट्रो प्रशासनाने उंच पत्र्याचे बॅरिकेटस लावले आहेत. यामुळे ह्या बॅरिकेटसच्या मागे असलेल्या हॉटेल, पेपर स्टॉल, चहावाले यांच्यापर्यंत ग्राहकांना पोहचायला बरीच कसरत करावी लागत आहे. पाम व्हयू इमारतीसमोर आणि प्रकाश उपाहारगृहाच्या बाजूने असे केवळ दोन मार्ग बाहेर पडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे दादरमधील प्रसिद्ध प्रकाश उपहारगृहातील विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. आम्हांला या दुकानात जाण्यासाठी जागाच नाहीये. एका छोट्या चिंचोळ््या गल्लीतून आम्हांला बरंच सव्य अपसव्य करून प्रकाशमध्ये जावे लागते. आणि पत्रे लावल्याने त्याठिकाणी धूळ,मातीमुळे बरंच कोंदट वातावरण असते अशी प्रतिक्रिया या भागातील रहिवासी आशा गोखले यांनी दिली. तर याच भागात काम सुरू झाल्यापासून दर्शनी बाजू बंद असल्याने आमचा उपाहारगृहाचा व्यवसाय ७५ टक्क्यांनी बसला आहे, असे एकादशी उपाहारगृहाचे मालक प्रताप नागवेकर यांनीही लोकमतशी बोलताना दिली.
याच कामांमुळे या भागातील प्रसिद्ध वृत्तपत्रविक्रेत्यांचा स्टॉल असणाºया मोहिते परिवाराला बसला आहे. मेट्रोच्या बॅरिकेटसमुळे आमचा स्टॉल मुख्य रस्त्यावरून आतल्या गल्लीत गेला आहे. त्यामुळे जागेअभावी वृत्तपत्र विकत घेण्यासाठी लोकांना आमच्या स्टॉलपर्यंत यायलाच मिळत नाही त्यामुळे आमचा धंदाही कमी झाला असून. पेपर दिवसभर पडून असल्याने आम्हांलाही फटका बसल्याचे मनोहर मोहिते यांनी सांगितले. ह्या भागातील छोट्या मोठ्या अश्या सर्व दुकानदार विक्रेते,स्टॉलधारकांचे असेच नुकसान होत आहे.
हीच परिस्थिती दक्षिण मुंबईतही आहे.
दक्षिण मुंबईतील चहा स्टॉलवालेही त्रस्त
दक्षिण मुंबईच्या विधानभवन परिसरात जो विधानभवन मार्ग आहे तिथल्या मागच्या गल्लीत अनेक विक्रेते वर्षानुवर्ष आपली दुकानं मांडून विक्री करतात. बाबू यादव यांचा गेल्या २२ वर्षापासून चहाचा स्टॉल याच भागात आहे. मात्र मेट्रोच्या कामामुळे त्यांचा अगदी मोक्याच्या ठिकाणावर असलेला स्टॉल आतील भागात गेल्याने व्यवसायावर गदा आली आहे़
ठिकठिकाणी अडवलेले रस्ते़़़ खोळंबलेली, तुंबलेली वाहने
सागर नेवरेकर
मुंबई : मेट्रोचे जाळे मुंबई शहरात झपाट्याने वाढत आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्याही दिवसेंदिवस वाढतेय. मेट्रोच्या कामात वापरले जाणारे बॅरिगेट्स काम झाल्यावरही त्यांना बाहेर काढण्यात मेट्रो प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचायला अधिक वेळ लागत आहे.
पश्चिम दु्रतगती महामार्ग आणि लिंक रोड (चारकोप) येथे मेट्रोचे काम सध्या सुरु आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथील दिंडोशी हद्दीमध्ये गोरेगाव हब मॉल आणि पुष्पा पार्क येथे वाहतूक कोंडी होते. तसेच बोरीवलीतील मागाठाणे बस स्टॉप येथे ही मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होते. लिंक रोड येथील भगतसिंग नगर दोन, काचपाडा जंक्शन, इन्फिनिटी मॉल, मीठ चौकी या मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. मेट्रोच्या कामासाठी मोठमोठ्या क्रेन आणल्या जातात. या क्रेनच्या चाकांची संख्या ६४ असते. भल्यामोठ्या क्रेनला जागा खूप लागत असून यामुळे ही वाहतूक कोंडीत भर पडते. दुचाकीस्वार वैभव कोलगे यांनी यासंदर्भात सांगितले की, मेट्रोचे काम सुरु झाले आहे. तेव्हापासून दुचाकी चालवणे अवघड झाले आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ते लहान झाले आहेत़ लहान गाड्यांना चिंचोळ््या मार्गातून वाहन चालवावे लागते.
बस प्रवासीही त्रस्त
च्मेट्रोच्या कामात लोखंडी बॅरिगेट्स लावली जातात. परंतू काम झाल्यावर बॅरिगेट्स त्वरित उचलले जात नाही. त्यामुळे वाहतुक कोंडीत जास्त भर पडते. काही बस थांबे ही हलविण्यात आले आहे. प्रवाशांना बस पकडताना नाहक त्रास होतो़