गणेशोत्सवातील मेट्रो कामाचे विघ्न दूर, आगमन, विसर्जन मार्गावरील बॅरिकेट्स मागे घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:58 AM2018-08-14T05:58:18+5:302018-08-14T05:58:34+5:30
गणशोेत्सवात बाप्पाची प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीवेळी जवळपास २२ ते २४ फूट रस्त्याची गरज असते. सध्या दक्षिण मुंबईतील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ रोड, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, ठाकूरद्वार अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे
मुंबई : गणशोेत्सवात बाप्पाची प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीवेळी जवळपास २२ ते २४ फूट रस्त्याची गरज असते. सध्या दक्षिण मुंबईतील गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ रोड, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, ठाकूरद्वार अशा महत्त्वाच्या रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे. येथूनच बाप्पाची मिरवणूक निघते. मात्र, येथील मेट्रो कामांसाठी उभारलेले बॅरिकेट्स बरेच पुढे आले आहेत. एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत हे निदर्शनास आल्यानंतर, गणेशोत्सवात येथील सर्व बॅरिकेट्सना मागे घेण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.
पालिका, एमएमआरडीए प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने या संदर्भात नुकत्याच घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. शिवाय या काळात रस्ता २२ ते २४ फूट मोकळा ठेवण्याचे आश्वासन एमएमआरडीएने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला दिले. त्यामुळे गणेशोत्सवातील मेट्रो कामाचे विघ्न दूर झाले आहे.
सध्या मुंबईत कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यानच्या मेट्रो-३ चे काम वेगाने सुरू आहे. यासाठी अनेक भागांत मेट्रोने बॅरिकेट्स लावले आहेत. बाप्पाचे आगमन मिरवणूक, अनंत चतुदर्शीच्या दिवशी व ५ आणि ७ दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी गिरगांव चौपाटीवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळेच या बॅरिकेट्सची अडचण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे एमएमआरडीए प्रशासनाने सांगितले.
दक्षिण मुंबईप्रमाणेच दादर चौपाटी, वरळी सीफेसवर होणाºया गणपती विसर्जन मार्गावरही कुठे मेट्रोची कामे सुरू असल्यास, गणेशोत्सव काळात तेथील बॅरिकेट्सही मागे घेण्यात येतील.