मेट्रो २ अ आणि मेट्रो ७; येत्या ऑक्टोबरमध्ये धावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोंची कामे वेगाने झाली आहेत. परिणामी आता या दोन्ही मेट्रो चाचणीसाठी सज्ज झाल्या असून, सोमवारी त्यांची चाचणी केली जाईल. त्यानंतर शेवटच्या टप्प्यातील अंतिम कामे पूर्ण करून या दोन्ही मेट्रो येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोच्या आकुर्ली स्थानकावर मेट्रोच्या चाचणी पूर्व कार्यक्रमात व्यक्त केला.
कोरोनामुळे कामात अडचणी येत आहेत. कामगार कमी आहेत. मात्र याचा कामावर परिणाम झालेला नाही. २०१६ साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले. पाच वर्षांत काम पूर्ण होत आहे. या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना फायदा होईल. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वतुर्ळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील. दरम्यान, मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन ६ कोचची आहे. कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८० आहे.
* अडथळ्यांवर मात
सोमवारी दुपारी १२.३० वाजता मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आम्ही अनेक अडथळे पार करत हा टप्पा गाठला आहे. कोरोनासारखा मोठा अडथळा आहे. आजही आम्ही त्याच्याशी दोन हात करत आहोत. आज आपण बऱ्यापैकी कामे पूर्ण करत असून, सोमवारी मेट्रो रेल्वेची चाचणी होईल.
- आर. ए. राजीव,
महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
---------------------
मेट्रो २ अ
मार्ग : दहिसर पूर्व ते डीएन नगर
लांबी : १८.५ किमी
खर्च : ६ हजार ४१० कोटी रुपये
१६ स्थानके : आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एक्सर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीरनगर, कामराजनगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूरनगर, गोरेगाव मेट्रो, आदर्शनगर, शास्त्रीनगर आणि डीएननगर.
-.--------------------
मेट्रो ७
मार्ग : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व
लांबी : १६ किमी
खर्च : ६ हजार २०८ कोटी रुपये
१३ स्थानके : दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व).
* अशी आहे मेट्रो
१. चालकविरहित
२. ऊर्जा वाचविणारी
३. प्रत्येक बाजूला चार स्वयंचलित दरवाजे
४. प्रवाशांना सायकलसह प्रवास करणे शक्य
५. एसी कोच
६. प्रत्येक डब्यात फायर फायटिंग
७. सीसीटीव्ही
८. प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची व्यवस्था
९. कमाल वेग मर्यादा ८० कि.मी. प्रतितास
१० इंटरनेटसाठी ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क
---------------------