Join us

ऐतिहासिक इमारतींलगत मेट्रोचे काम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 6:04 AM

दक्षिण मुंबईतील जे.एन. पेटीट संस्था व वाचनालयाच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीजवळ मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला हिरवा कंदील दाखवला आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे.एन. पेटीट संस्था व वाचनालयाच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतीजवळ मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू करण्यास उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलला हिरवा कंदील दाखवला आहे. बांधकामाला दिलेली स्थगिती बुधवारी हटविली. जे.एन. पेटीट संस्था व वाचनालय तसेच या परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींचे नुकसान होऊ देऊ नका, असे निर्देश न्यायालयाने एमएआरसीएलला दिले.उच्च न्यायालयाने यासंबंधी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएआरसीएल) मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाला दिली. त्यानंतर न्यायालयाने ही स्थगिती हटविली.सप्टेंबर महिन्यात जे.एन. पेटीटच्या विश्वस्तांनी मेट्रो-३ च्या भुयार खोदण्याच्या कामामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींच्या पायाला हानी पोहोचत असल्याची तक्रार करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने जे.एन. पेटीट वाचनालय व बगीचाजवळ मेट्रो-३ प्रकल्पाचे खोदकाम बंद करण्याचा आदेश एमएमआरसीएलला दिला.यादरम्यान न्यायालयाने मेट्रो-३ च्या भुयारी कामामुळे जे.एन. पेटीट व याच परिसरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींवर काय परिणाम होणार आहे, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीने या इमारतींना हानी पोहोचू नये, यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी हमी मंगळवारी एमएमआरसीएलने न्यायालयाला दिली. या हमीनंतर उच्च न्यायालयाने मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती हटविली.

टॅग्स :मेट्रोमुंबई