मुंबई : मुंबईत पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला तसेच मानखुर्द येथे मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीला कमी मार्गिका मिळत आहेत, तर तिथे सकाळी एक डंपर बंद पडल्याने ११ ते १ च्या दरम्यान वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. दुपारी उशिराने वाहतूक पूर्ववत झाली.
एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या दोन्ही उड्डाणपुलांवर मेट्रोचे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. जकात नाका येथून सात मार्गिकांची वाहतूक येते. ती दोन मार्गिकांमधून पुढे जाते. त्यामुळे ५ मार्गिका अडतात, तर पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा वेग ७० ते ९० किमी असतो. त्यामुळे वाहतूककोंडी होते. दोन मार्गिकांमधून वाहतूक १० ते २० किमीच्या वेगाने सुरू असते. घाटकोपर मानखुर्द लिंकरोड बंद करण्यात आला आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे पूर्वमुक्त मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वडाळा, दादर, परळ भागात तीव्र वाहतूककोंडी झाली. या सर्वच ठिकाणी वाहतुकीचा वेग खूपच मंदावला होता. सामान्य नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दुपारनंतर मुंबईकरांचा रस्ते प्रवास हळूहळू सुरू झाला.