मेट्रोच्या कामांनी पकडला वेग; नव्या वर्षात होणार पश्चिम उपनगरातल्या मेट्रोची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:27 PM2020-11-26T18:27:49+5:302020-11-26T18:28:08+5:30
Metro works pick up speed : डिसेंबर महिन्यात या दोन्ही मेट्रो मार्गांसाठीच्या मेट्रो गाड्या मुंबईत येण्यास सुरुवात होणार.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामे वेगाने सुरु असून, पश्चिम उपनगरात येत असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या मेट्रो मार्गाचे कामदेखील वेगाने सुरु आहे. प्राधिकरणाच्या दाव्यानुसार, याच वेगाने मेट्रोचे काम सुरु राहिले तर नव्या वर्षांत या दोन्ही मेट्रोची चाचणी केली जाईल; आणि त्यानंतर या दोन्ही मेट्रो प्रवासांसाठी रुळांवर उतरतील. दरम्यान, डिसेंबर महिन्यात या दोन्ही मेट्रो मार्गांसाठीच्या मेट्रो गाड्या मुंबईत येण्यास सुरुवात होणार असून, त्यानंतर मेट्रो आणखी वेग पकडणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या मेट्रो-२ अ (दहिसर-डी.एन.नगर) आणि मेट्रो-७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या दोन्ही मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने सुरु असून, या दोन्ही मेट्रो नव्या वर्षांत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. एमएमआरडीएतर्फे १२ मेट्रो गाड्यांची आॅर्डर देण्यात आली आहे. जानेवारीच्या मध्यात मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ वर मेट्रोची चाचणी सुरु होईल. मेट्रोच्या सर्व गाड्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असून, त्या पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात आहे.
मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा विचार होता. मात्र कोरोनाचा मोठा फटाका मुंबईतल्या मेट्रो कामांना बसला आहे. कित्येक मेट्रोच्या कामाच्या डेडलाईन सहा महिन्यांनी लांबणीवर पडल्या आहेत. मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ देखील डिसेंबरपर्यंत सुरु होणार होती. मात्र कोरोनामुळे मेट्रोची धाव लांबणीवर पडली. ११ डिसेंबर रोजी मेट्रो कोचचे मुंबईत दाखल होणार आहेत. चारकोपमध्ये हे मेट्रो कोच दाखल होतील. मेट्रो सुरु करतानाच दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर ठेवले जाईल.
--------------------
मार्ग : मेट्रो-२ अ - दहिसर ते डि.एन. नगर
किमी : १८.५८९ किमी
मार्ग : उन्नत
स्थानके : १७
तिकिट दर : १०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे
फायदा : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न रेल्वे, मेट्रो लाईन १, मेट्रो लाईन २ ब आणि अंधेरी ते दहिसर यांच्यात संपर्क होईल. मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई जोडली जाईल. प्रवासाची वेळ ५० टक्के वाचेल.
--------------------
मार्ग : मेट्रो-७ - दहिसर पूर्व ते अंधेरी अंधेरी पूर्व
किमी : १६.४७५ किमी
मार्ग : उन्नत
स्थानके : १३
तिकिट दर : १०, २०, ३० आणि ४० रुपयांप्रमाणे
फायदा : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, पश्चिम रेल्वे, मेट्रो १, मेट्रो २ अ यांना जोड. अंधेरी, जेव्हीएलआर आणि दहिसर येथील उपनगरीय रेल्वे प्रणाली आणि वाहतूक यंत्रणा सुलभ होईल. मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई जोडली जाईल. हा प्रकल्प विमानतळ, नॅशनल पार्क आणि इतर व्यावसायिक भाग जोडेल. प्रवासाची वेळ ५० टक्के वाचेल.