मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे नव्या वर्षात मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मोठे वाहतूक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पात मुंबई पारबंदर प्रकल्प (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक), कलानगर जंक्शनवरील दोन फ्लायओव्हर आणि कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग यांचा समावेश असून, नव्या वर्षात या प्रकल्पाचे काम वेगाने करण्याचा निर्धार प्राधिकरणाने केला आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा देशातील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प हाती घेतला असतानाच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आपल्या वाहतूक प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईला मुख्य भूमीशी जोडणारा आणि मुख्य भूमी व रायगड जिल्ह्याच्या काही परिसरांचा विकास करण्यासाठी २२ किलोमीटर लांबीचा मुंबई पारबंदर प्रकल्प अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. २२ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते मुख्य भूमी अशी जोडणी उपलब्ध होईल. शिवाय मुख्य भूमीप्रमाणेच रायगड जिल्ह्याच्या काही परिसरांचा विकास करणे शक्य होईल.मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगराच्या मध्यभागी म्हणजे वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी कलानगर जंक्शन येथे सी-लिंकच्या दिशेने जाणारा व वांद्रे-कुर्ला संकुलाच्या दिशेने येणारा असे दोन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत. शिवाय कुर्ला ते वाकोला असा पाच किलोमीटर लांबीचा एक उन्नत मार्गही एमएमआरडीएतर्फे बांधण्यात येणार असून, या दोन्ही प्रकल्पांमुळे वांद्रे-कुर्ला संकुलास भेट देणे अधिक सोपे होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.