Join us

महानगराचा वेग वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 5:26 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेमधील मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे सध्याच्या उपनगरीय रेल्वेसेवेवर प्रचंड ताण पडत आहे. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी रस्ते आणि रेल्वेच्या क्षमतेमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये रेल्वे आधारित सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील मेट्रो मार्गाने महत्त्वाची स्थानके जोडण्यात येणार आहेत. यामध्ये चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई सेंट्रल, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ आणि प्रमुख व्यापारी केंद्रे जोडली जाणार आहेत, तसेच या मार्गांमुळे मुंबई शेजारील ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार इत्यादी शहरे जोडली जाऊन ठिकठिकाणी परिवहन अदलाबदलीची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. सुमारे २८१.४ किमी मेट्रो मार्गाचे जाळे तयार होणार आहे. हे सर्व मेट्रो मार्ग आगामी काळात कार्यन्वित झाल्यावर दररोज सुमारे ७० लाख प्रवाशांना फायदा होणार असून, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होणार आहे.मेट्रो मार्गिकांच्या या जाळ्यामुळे दहिसर-वांद्रे पश्चिम-बीकेसी-मानखुर्द- ठाणे, तसेच अंधेरी (पूर्व), घाटकोपर, मुलुंड आणि वडाळा यांसारख्या परिसरांशी जोडणी उपलब्ध होणार आहे. यामुळे या भागांमधील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे, तर कुलाबा-वांद्रे सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे कुलाबा, काळबादेवी, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी, दादर, धारावीप्रमाणेच आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणेच एमआयडीसी आणि सीप्झसारख्या परिसरांशी जोडणी होणार आहे. ही मार्गिका पश्चिम रेल्वेला पर्याय असल्याने, रेल्वे मार्गावरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. हे सर्व मेट्रो मार्ग एकामेकांशी संलग्न असतील, तसेच मोनो मार्ग आणि उपनगरीय रेल्वे सेवांशीही जोडणी उपलब्ध असणार आहे. मेट्रो-१०,११, १२ मार्गिकांना मंत्रिमंडळाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.