पडघा/भिवंडी/खारेगाव/डोंबिवली/कल्याण/ठाणे : रेल्वेची वाहतूक ठप्प होताच प्रवाशांनी आणि चाकरमान्यांनी शहर बस वाहतूक, रिक्षा, एस.टी. आणि काळी-पिवळी, टॅक्सी यांचा आश्रय घेतल्याने रस्ते वाहतूकीवर अभूतपूर्व ताण येऊन मुंबई-नाशिक आणि कल्याण-भिवंडी या चौफुलीवर न भूतो न भविष्यती अशी कोंडी झाली. हा सगळा प्रकार अचानक घडल्याने त्याला तोंड देण्यास ना पोलीस यंत्रणा सज्ज होती ना एस.टी अथवा परिवहन सेवा तयारीत होत्या. यामुळे प्रवाशी आणि चाकरमानी यांची तासन्तास रखडपट्टी झाली. खारेगाव टोलनाका त्यानंतर दिवे अंजूर, माणकोली जंक्शन, कल्याण फाटा,पडघा टोलनाका अशा एकूण पाच पॉर्इंटवर एकाच वेळी वाहतूक कोंडी झाल्याने नेमके काय झाले आहे आणि काय करायला हवे हे कोणालाच कळत नव्हते. सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती. एका सिग्नलच्या काळात फक्त दोन-चार वाहने कशीबशी सिग्नल पार करू शकत होती. परिणामी, कोंडी फुटणे अवघड होत होते. प्रत्येक मिनिटाला कोंडीत प्रचंड भर पडत होती. मिळेल त्या बाजूने आणि रस्त्याने लवकर पुढे जाण्याच्या प्रयत्नात सगळीच वाहने घुसत गेल्याने समोर हिरवा सिग्नल दिसतो आहे पण कोंडीमुळे वाहने पुढे सरकत नाहीत अशी स्थिती होती. वाहतूक पोलिसांना तरी आपण कुठे कुठे आणि काय काय करावे असा प्रश्न पडला होता. ही कोंडी काही ठिकाणी ५ ते १० कि.मी. लांबीची होती. ही महत्वाची जंक्शन कोंडीग्रस्त झाल्यामुळे त्याचा परिणाम भिवंडी शहरातील आणि कल्याण शहरातील अंतर्गत रस्ते वाहतूक कोंडीग्रस्त होण्यात झाला. म्हणजे महामार्गावरही कोंडी आणि शहरातही कोंडी अशी विचित्र अवस्था निर्माण झाली. यामुळे एस.टी. आणि परिवहन सेवांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. जे प्रवासात होते किंवा ज्यांना काय झाले आहे हे माहित नव्हते त्यांचे तर प्रचंड हाल झाले. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा ते कल्याण दरम्यान मध्येच थांबविल्या होत्या. त्यातील प्रवाशांनी प्रवास अर्धवट सोडून रिक्षा, खाजगी वाहने आणि बस यांचा आधार घेतल्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडली. लांबलचक ट्रेलर आणि कंटेनर यांच्यामुळे ती सतत वाढत गेली. कल्याण फाट्यावर दहा-बारा वाहतूक पोलीस असूनही कोंडी नियंत्रणात येत नव्हती. आमच्या आयुष्यात आम्ही एवढी भयानक वाहतूक कोंडी पाहिली नाही. अशी प्रतिक्रिया पोलिसांनीच दिली. यामध्ये रिक्षाचालकांचा आणि काळी पिवळी चालविणाऱ्यांचा तसेच टॅक्सीचा धंदा साफ बुडाला. लोकल बंद म्हणजे आमच्या धंद्याची चंगळ असे समीकरण मानले जाते. परंतु आजच्या वाहतूककोंडीमुळे आमचा रोजच्या इतकाही धंदा झाला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. झाला प्रकार हा इतका अनपेक्षितपणे व कुणाच्याही काही लक्षात येण्याच्या आत झाला. त्यामुळे या कोंडीचे निराकरण कसे करावे, याची कल्पनाच कुणाला येत नव्हती. यापुढे अशा प्रसंगावर मात करण्यासाठी योजना तयार ठेवावी लागेल. असे वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)४एकाच वेळी शहरात, महामार्गावर कोंडी४ठाणे नाशिक महामार्गावर पाच ठिकाणी कोंडी४खाजगी वाहनांचा धंदा बुडाला४अशा आपत्तींच्या निवारण्याची योजना सज्ज ठेवावी लागणार४वाहतूक पोलीस ठरले तुटपुंजे
अभूतपूर्व वाहतूककोंडीने महानगरे हैराण
By admin | Published: January 02, 2015 10:51 PM