- संदीप शिंदेमुंबई : मेट्रो स्थानक परिसरात सायकल ट्रॅक, सीसीटीव्ही, बसवाहतुकीसाठी मार्गिका, हरित पदपथ आदी सुखकर प्रवाससाच्या सेवा देण्यासाठी एमएमआरडीएने बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरणाचा प्रस्ताव (एमएमआय) तयार केला. प्रत्येक स्थानकासाठी सरासरी २५ कोटी खर्चाची तयारी होती. मात्र, त्याला मुरड घालून हा खर्च ११ कोटी ९० लाखांपर्यंत कमी केला.प्राधिकरणाच्या ८ जुलै, २०१९च्या बैठकीत मेट्रो मार्गिकांवरील १५५ स्थानकांच्या मल्टी मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) व्यवस्थेसाठी ३ हजार ८५० कोटींच्या खर्चास मान्यता दिली. खर्च कमी करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार मेट्रो प्रकल्प २ अ (अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व) आणि मार्ग ७ (गुंदवली ते दहिसर पूर्व) वरील ३० स्थानकांसाठी ३५६ कोटी खर्चाचा आराखडा तयार केल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून हाती आली आहे. हे दोन्ही मार्ग पुढील वर्षाअखेरीपर्यंत कार्यान्वित होतील. ३० स्थानकांसाठी एमएमआयची अंमलबजावणी असेल.मेट्रो दोन मार्गिकेवरील पहिल्या दोन पॅकेजसाठी अनुक्रमे ८२ कोटी ५५ लाख व ९८ कोटी १५ लाख खर्च केले जातील. तर, मेट्रो सातवरील तिसºया, चौथ्या पॅकेजचा खर्च अनुक्रमे ९१ कोटी ४ लाख व ८५ कोटी १२ लाख आहे. कामाच्या नियोजनासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. एनडीबी, एडीबी या वित्तीय संस्थांनी कर्जपुरवठा केला. शिल्लक कर्जाची रक्कम एमएमआय कामांसाठी वापरली जाईल. ती संपल्यावर प्राधिकरणाच्या तिजोरीतून निधी दिला जाईल.५० टक्के निधी मुंबई पालिकेचा : कामांचा खर्च स्थानिक महापालिका आणि एमएमआरडीएने ५०-५० टक्के उचलावा असा निर्णय एकीकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (उमटा) बैठकीत झाला आहे. पहिल्या दोन मार्गिकांवरील ३० स्थानके मुंबई महापालिकेच्या हद्दीत असल्याने त्यांच्या तिजोरीतून १७८ कोटी ४३ लाख रुपये मिळतील, अशी एमएमआरडीएची अपेक्षा आहे.
मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘एमएमआय’ योजनेला कात्री, प्रत्येक स्थानक परिसरातील खर्च १३ कोटींनी कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:56 AM