दोन वर्षांत उभे राहणार मेट्रोचे कारशेड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:22 AM2019-10-05T07:22:50+5:302019-10-05T07:23:06+5:30
मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेला प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली.
मुंबई : मेट्रो-३ मार्गिकेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेला प्राधिकरणाने दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) आरे कॉलनीमध्ये कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता एमएमआरसी लवकरच या ठिकाणी कारशेड उभारण्याचे काम सुरू करणार आहे. आरेत दोन वर्षांत मेट्रोचे कारशेड उभे राहणार आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी आरे कॉलनीमध्ये कारशेड बांधण्याचे काम सुरू होणार होते. मात्र, पर्यावरणवाद्यांनी या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतल्याने हे काम होऊ शकले नाही. एमएमआरसीने आरेमधील कारशेडचा आराखडा तयार केला आहे. येथे कारशेड उभारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. ही कारशेड २५ हेक्टर क्षेत्रावर उभारली जाणार आहे. यामध्ये दोन मेंटनन्स शेड, आॅपरेशनल आणि कंट्रोल सेंटर, पॉवर सप्लाय यासाठीही सबस्टेशन उभारण्यात येणार आहे.
यातील २,७०२ इतकी झाडे आरे वसाहतीतील कार डेपोच्या बांधकामासाठी बाधित होत आहेत. यामधील २,२३८ झाडे तोडण्यात येणार आहेत, तर ४६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
२५ हेक्टर क्षेत्राचा होणार वापर
मेट्रो - तीनचे कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील २५ हेक्टर क्षेत्राचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये दोन मेंटनन्स शेड, आॅपरेशनल आणि कंट्रोल सेंटर, पॉवर सप्लाय यासाठीही सबस्टेशन उभारण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वीच हे काम सुरू होणार होते. मात्र जोरदार विरोधानंतर तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने हे काम एमएमआरसीला थांबवावे लागले होते.
सरकारच्या अट्टाहासाला पर्यावरणवाद्यांंचा आक्षेप
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आरेतील मेट्रो - तीनच्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या कारशेडसाठी झाडांचा बळी जाणार असून, पर्यायी ठिकाणी जागा उपलब्ध असताना आरेतच कारशेडचा अट्टाहास का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
मुंबईकरांनी २०१४ सालापासून सातत्याने आरेतील झाडे वाचविण्यासाठी आंदोलने केली आहेत. आरेमध्ये ५ आठवड्यांपासून आंदोलन सुरू असून राज्य सरकार आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
करीत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या भूमिकेविरुद्ध
लाखोंच्या संख्येने मुंबईकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करीत आहोत.
- रोहित जोशी
न्यायालयाने अजूनही ठोस निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आमच्या बाजूने निर्णय लागेल, अशी थोडीफार आशा आहे. मेट्रो-तीन करशेडसाठी २,६४६ झाडे तोडली जाणार आहेत. त्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत काही करता येईल का, यासाठी प्रयत्न करू. - झोरू बाथेना
आरे जंगल घोषित करा, यासाठी वनशक्ती प्रकल्पाने याचिका दाखल केली होती. न्यायालयात त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात पुरावे सादर केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे यावर निर्णय देऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले.
- डी. स्टॅलिन
कांजूरमार्गमध्ये ४८ हेक्टर जमीन उपलब्ध आहे, हे न्यायालयात सुनावणीदरम्यान सिद्ध झाले. दिल्लीमध्ये मेट्रो लाइनच्या मधल्या जागेत कारशेड उभारण्यात आले आहे. तर मुंबईत अशा प्रकारचे कारशेड बांधता येऊ शकते. पर्यायी जागा उपलब्ध असताना एमएमआरसीएल त्याकडे कानाडोळा करीत आहे.
- अम्रिता भट्टाचारजी