मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून देण्यात आली, तसेच पर्यावरणाचा विचार करत ग्रीन मुव्हमेंटदेखील हाती घेण्यात आली आहे.
सुरक्षा प्रणालीचा आढावा घेताना चारकोप मेट्रो डेपोमध्ये हरित सौंदर्यशास्त्राच्या पालनासाठी बागकाम आणि वृक्षारोपणावर भर दिला जात आहे. शिवाय श्रमदानांतर्गत ग्रीन मुव्हमेंटदेखील सुरू करण्यात आली आहे. तर अग्निशामक प्रशिक्षण सत्रदेखील अग्निशामक नियंत्रणास सुधारण्यासाठी महत्त्वाचे असून, याचेदेखील प्रशिक्षण दिले जात आहे. प्रथमोपचार प्रशिक्षणदेखील दिले जात असून, यात मुंबई महापालिकेच्या परळ येथील शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचा समावेश आहे. स्टेशन कंट्रोलर्स, ट्रेन पायलटस, सुरक्षारक्षक यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे असून, यांना यात सामील करून घेतले जात आहे. आग लागू नये म्हणून काय करता येईल. आगीवर वेळीच कसे नियंत्रण मिळवायचे, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे.