मेट्रोच्या भूमिपूजनाचा खडखडाट फार, धाव मात्र अजूनही तोकडीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:00 AM2020-03-04T07:00:58+5:302020-03-04T07:01:06+5:30
मात्र येत्या पाच वर्षांत सुमारे २३८ किमी मार्गावर मेट्रो धावू लागेल. मुंबई, नागपूरपाठोपाठ पुणे, नवी मुंबई ही शहरेही मेट्रोच्या मार्गावर येतील.
सचिन लुंगसे
मुंबई : गेल्या पाच वर्षांत मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा फार खडखडाट झाला असला तरी प्रत्यक्षात मेट्रो मार्गाची धाव फक्त १४ किमी एवढीच आहे. मात्र येत्या पाच वर्षांत सुमारे २३८ किमी मार्गावर मेट्रो धावू लागेल. मुंबई, नागपूरपाठोपाठ पुणे, नवी मुंबई ही शहरेही मेट्रोच्या मार्गावर येतील.
जून २०१४ मध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर राज्यातील पहिली मेट्रो धावली. त्यानंतर, २०१९ मध्ये नागपूर मेट्रो धावली. २३८ किमींच्या एकूण मेट्रो प्रकल्पांसाठी सुमारे एक लाख ४० हजार ८१४ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
नागपूरमध्ये सध्या तीन किमी मार्गावर मेट्रो धावते आहे. एकूण २५ किमीवर बांधकाम सुरू आहे. ८ हजार ६८० कोटींचा हा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. पुण्यात सुरू असलेल्या मेट्रोच्या दोन्ही कॉरिडॉरचे एकूण काम ३८ टक्के झाले आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च ११ हजार ४२० कोटींचा आहे.
>मुंबईत १७ मेट्रो मार्ग : मुंबई महानगर प्रदेशात १६ मेट्रोची कामे सुरू आहेत. तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून भुयारी मेट्रो-३ चे काम सुरू आहे. नवी मुंबईत सिडकोमार्फत मेट्रो तयार होत असून, त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ती वर्षअखेरीस सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
>सुरू असलेले प्रकल्प
प्रकल्प काम सुरू
पुणे मेट्रो ३१.५ं
मुंबई मेट्रो १७१
नागपूर मेट्रो २४.५
नवी मुंबई मेट्रो ११.१
>राज्यातील कार्यान्वित मेट्रो
प्रकल्प किलोमीटर स्थानके
मुंबई मेट्रो ११ १२
मुंबई मोनोरेल २० १७
नागपूर मेट्रो ०३ १७