Join us

मेट्राे मार्गी लागली आणि रस्ते झाले माेकळे; काेंडी कमी, चालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:48 AM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो ३ चे काम करण्यात येत असून, कुलाबा-वांद्रे - सीप्झ असा हा मार्ग आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात भुयारी मेट्रो ३ च्या कामासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेड्स आता काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे अरुंद झालेले रस्ते आता पुन्हा एकदा रूंद होत आहेत. मेट्रो ३ च्या स्थानकांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांवरील वाहतूक कोंडी आता कमी होत असल्याने मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा मिळू लागला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो ३ चे काम करण्यात येत असून, कुलाबा-वांद्रे - सीप्झ असा हा मार्ग आहे. सद्य:स्थितीमध्ये मेट्रो ३ च्या कामाने बऱ्यापैकी वेग पकडला असून, सीप्झ ते वांद्रे या पहिल्या टप्प्यात नव्या वर्षात मेट्रो सुरु करण्याचा कॉर्पोरेशनचा मानस आहे. त्यानुसार, स्थानकांवरील कामांनी वेग पकडला असून, बहुतांश कामे ही ८० टक्क्यांवर झाली आहेत. स्थानकांची कामे करण्यासाठी कॉर्पोरेशनकडून मुंबई बॅरिकेडिंग करण्यात आले होते.

आता विधानभवन परिसरातील व्ही.व्ही. राव मार्गावरील बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बऱ्यापैकी मोकळा झाला आहे. बीकेसी येथील स्थानकांची कामेही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. विद्यानगरी आणि धारावी येथेही बऱ्यापैकी कामे पूर्ण होत आली आहेत. हुतात्मा चौक येथील काम प्रगतिपथावर आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून काही ठिकाणी बॅरिकेडिंग काढले आहे.

वरळी नाका ते महालक्ष्मी, दादर, माहीम येथील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, येथील बॅरिकेडिंग कायम असल्याने रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे येथे कोंडीची अडचण कायम आहे. तीन एक महिन्यांपूर्वी अंधेरी परिसरातील बॅरिकेडिंगही कॉर्पोरेशनकडून काढण्यात आल्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहन चालकांना दिलासा मिळाला होता. मेट्रो ३ व्यतिरिक्त आता उर्वरित मेट्रो म्हणजे मेट्रो २ ब (डी.एन.नगर ते मंडाळे) चे काम वेगाने सुरु आहे. यासाठी कुर्ला आणि परिसरात बॅरिकेडिंग केले आहे. याचा ताण लालबहादूर शास्त्री मार्गावर येत असल्याने हा मार्ग आणि जवळच्या रस्त्यावर कोंडी होत आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबईवाहतूक कोंडी