येत्या पंधरा दिवसांत मेट्रोची ‘ट्रायल रन’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:44 AM2024-02-06T10:44:55+5:302024-02-06T10:45:57+5:30
उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी बीकेसी मेट्रो रेल्वेस्थानकाला भेट देत कामाचा आढावा घेतला.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रोचे काम वेगाने सुरू असून, आता आरे ते बीकेसीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी कॉर्पोरेशनने कंबर कसली असून, येत्या पंधरा दिवसांत पहिल्या टप्प्यात मेट्रोची ट्रायल रन घेतली जाणार आहे.
आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यादरम्यान मेट्रो सुरू करण्यासाठी मार्च महिन्यापासूनच तयारी सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल - मे दरम्यान पहिला टप्पा सुरू करण्यावर प्राधिकरणाचा भर राहणार आहे. पहिला टप्पा सुरू केल्यानंतर बीकेसी ते वरळी असा टप्पा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर पुढील टप्प्यासाठी काम केले जाईल.
वरळी येथील आचार्य अत्रे स्थानकापर्यंत ऑगस्टदरम्यान मेट्रो सुरू करण्यासाठी हालचाली केल्या जातील, तर वर्षाखेरीस संपूर्ण मार्ग प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
आरे कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. रुळावर धावण्यासाठीच्या आवश्यक मेट्रो मुंबईत दाखल झाल्या आहेत.
पहिल्या टप्प्यातील स्थानकांची कामेही पूर्ण होत आली असून, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकनंतर आता कोस्टल रोड सेवेत येणार असून, त्यानंतर भुयारी मेट्रो सेवेत येणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसाट होईल.